आयना का बायना, घेतल्याशिवाय जाईना... वन डे वर्ल्ड कप आपणच जिंकणार, हे स्वप्न घेऊन नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९५ लाखांहून अधिक क्रिकेट चाहते उपस्थित राहिले होते. भारतात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये यजमान हा एकमेव संघ होता, जो सलग १० सामन्यांत अपराजित राहून फायनलपर्यंत पोहोचला होता. पण, समोर पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असल्याने मनात धाकधुक होतीच आणि ही भीती खरी ठरली. ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला आणि कर्णधार पॅट कमिन्सने दिलेला शब्द खरा ठरवला. लाखभर चाहत्यांना गप्प करण्याचा निर्धार त्याने सामन्यापूर्वीच बोलून दाखवला होता आणि तसेच घडले.
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने विजयी धाव घेतली आणि स्मशान शांतता पसरली. स्टेडियमवर जल्लोष होता तो फक्त अन् फक्त ऑसी खेळाडूंचा व स्टेडियमवर उपस्थित एखाद दुसऱ्या त्यांच्या चाहत्यांचा... रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासाठी अधिक दुःख वाटले, कारण ते पुढील वन डे वर्ल्ड कप खेळतील की नाही, याची गॅरंटी नाही. त्यामुळे हा वर्ल्ड कप त्यांच्यासाठी तरी जिंकायला हवा होता. ऑस्ट्रेलियाकडून हार झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली यांचे डोळे पाणावलेले दिसले, मोहम्मद सिराज ढसाढसा रडला.. रोहित व विराटची ही अवस्था पाहून चाहतेही भावुक झाले.
भारताचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) मनातून तुटला... भारताचा माजी खेळाडू एस बद्रिनाथ याच्यासह यूट्युब चॅनेलवर बोलताना अश्विनने वर्ल्ड कप फायनलनंतर संघात काय वातावरण होते ते सांगितले. ''हो, त्या वेदना आम्हाला कळत होत्या. रोहित व विराट रडत होते. त्यांना पाहून अजून वाईट वाटत होतं. हा अनुभवी संघ होता आणि प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची जाण होती. पण, हा खेळ आहे. रोहित व विराट यांनी या स्पर्धेत सर्वस्व दिले होते,''असे अश्विन म्हणाला.
रोहितने या स्पर्धेत ११ सामन्यांत ५९७ धावा केल्या. अश्विनने रोहितच्या नेतृत्वशैलीचे कौतुक केले. तो म्हणाला, जर तुम्ही भारतीय क्रिकेटकडे पाहिले तर प्रत्येकजण तुम्हाला सांगेल की महेंद्रसिंग धोनी हा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. रोहित शर्मा एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. तो संघातील प्रत्येक व्यक्तीला समजून घेतो, आपल्यापैकी प्रत्येकाला काय आवडते आणि काय आवडत नाही हे त्याला ठाऊक आहे. त्याला मोठी समज आहे. तो प्रत्येक सदस्याला वैयक्तिकरित्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
"तो खूप प्रयत्न करतो. झोपेचा त्याग करतो आणि मीटिंगचा भाग बनतो. प्रत्येक व्यक्तीला डावपेच कसे समजावून घ्यावेत हे समजून घेण्यासाठी तो प्रयत्न करतो. भारतीय क्रिकेटमधील नेतृत्वाची ही प्रगत पातळी आहे. मी रोहितला बऱ्याच काळापासून ओळखतो,''असेही अश्विन म्हणाला.