Join us  

Ravi Bishnoi Gautam Gambhir, IND vs SL: "गंभीर मला म्हणाला की तुझं जे काही चाललंय ते..."; रवी बिश्नोईने सगळंच खरं खरं सांगून टाकलं!

Ravi Bishnoi Gautam Gambhir, IND vs SL 2nd T20: दुसऱ्या टी२० सामन्यात ३ विकेट्स घेणारा रवी बिश्नोई ठरला सामनावीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 5:26 PM

Open in App

Ravi Bishnoi Gautam Gambhir, IND vs SL 2nd T20: भारतीय संघाने श्रीलंकेत सुरु असलेल्या टी२० मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांनी पहिल्याच परीक्षेत २-०ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा टी२० सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. श्रीलंकेने ( Sri Lanka ) प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १६१ धावा केल्या. भारताची फलंदाजी सुरु असताना पाऊस आल्याने टीम इंडियाला DLS पद्धतीने ८ षटकांत ७८ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. हे आव्हान भारतीय संघाने ६.३ षटकांत पूर्ण केले. २६ धावांत ३ बळी घेणाऱ्या रवी बिश्नोईला सामनावीराचा किताब मिळाला. त्यानंतर त्याने गौतम गंभीरबद्दल मत व्यक्त केले.

"गौतम गंभीर याच्याशी माझं नातं खूपच छान आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये गंभीर दोन वर्षे होता. त्यावेळी मी त्याच्यासोबत खेळलो आहे. टीम इंडियाचा कोच झाल्यानंतर गंभीरने मला माझ्या गोलंदाजीत कुठलाही बदल करायला सांगितला नाही. तो मला म्हणाला की सध्या तुझं जे काही सुरु आहे तेच सुरु ठेव. आधीही गंभीरच्या सल्ल्याचा मला फायदा झाला होता आणि आताही त्याच्या मार्गदर्शनाचा मला उपयोगच होतोय," अशा शब्दांत भारतीय संघाचा फिरकीपटू रवी बिश्नोईने नव्या प्रशिक्षकाबद्दल मत मांडले.

"सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करतोय. ऑस्ट्रेलिया सिरिजमध्ये मी त्याच्या नेतृत्वात खेळलो होतो. तो उत्तमच आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाची कलाही चांगली आहे. झिम्बाब्वेमध्ये त्याने उत्तम कॅप्टन्सी केली. दोघांनीही मला गोलंदाज म्हणून प्रोत्साहन दिले. तुमच्या कर्णधाराचा तुम्हाला पाठिंबा मिळत असेल तर तुम्हाला आणखी कशाची गरज भासत नाही. सूर्या आणि शुबमन दोघेही उत्तम लीडर आहेत," असेही रवी बिश्नोई म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकागौतम गंभीरश्रीलंकाभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ