xRavi Shastri 15 crore, IPL 2022 : भारतीय संघाचे माजी खेळाडू व माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखले जायचे. आता अष्टपैलू खेळाडूंची वाढती मागणी पाहून, शास्त्रींना आनंद होत आहे. विशेषता, ट्वेंटी-२० सारख्या फॉरमॅटमध्ये अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व वाढले आहे. यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्येही याची प्रचिती आली आहे.
१२ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित शास्त्रींनी एक कसोटी व ११ वन डे सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले. त्यांनी ८० कसोटी व १५० वन डे सामन्यांत प्रतिनिधित्व केले. कसोटीत त्यांच्या नावावर ३८३० धावा आणि १५१ विकेट्स आहेत, तर वन डे क्रिकेटमध्ये ३१०८ धावा व १२९ विकेट्स आहेत. क्रिकेट कारकीर्दिनंतर ते समालोचनाकडे वळले. त्यानंतर ७ वर्ष ते भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये होते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१नंतर त्यांनी मुख्य प्रशिक्षकाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. आता आयपीएल २०२२मध्ये ते पुन्हा समालोचनाकडे वळले आहेत.
ESPNCricinfo सोबत बोलताना १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू शास्त्री यांनी ते आयपीएल ऑक्शनमध्ये असते तर किती बोली लागली असती यावर भाष्य केले. ''मला सहज १५ कोटी मिळाले असले. त्यात काही शंकाच नाही आणि मला फ्रँचायझीने कर्णधारपदही दिले असते,''असा दावा त्यांनी केला.
बीसीसीआयचे नियम मूर्खपणाचे; 'ती' संधी नाकारल्यानं रवी शास्त्री भडकले
भारतीय संघाचे माजी मुख्य कोच राहिलेले माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी आगामी आयपीएलमध्ये पुन्हा समालोचनाकडे वळण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्टार वाहिनीने त्यांचा पॅनलमध्ये समावेशही केला. तथापि, बीसीसीआयने त्यांना ही संधी नाकारताच शास्त्री चांगलेच भडकले आहेत. बीसीसीआयच्या संविधानानुसार हे परस्पर हितसंबंध साधल्याचे (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) मानला जातो, असे सांगून बीसीसीआयने त्यांना समालोचन पॅनलमधून वगळले. शास्त्री हे राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत.
समालोचकाच्या भूमिकेत पुनरागमन करण्यासाठी ते उत्सुक होते. गेल्या पाच वर्षांत समालोचन करू न शकल्याने त्यांनी बीसीसीआयच्या नियमांवर बोट ठेवले आहे. ५९ वर्षांचे शास्त्री म्हणाले की, ‘आयपीएलचा हा १५ वा हंगाम आहे, मी याआधी ११ वर्षे समालोचन केले आणि नंतर गेल्या काही हंगामात ते करू शकलो नाही. कारण बीसीसीआयच्या घटनेतील काही मूर्ख नियमांनी आम्हाला बांधून ठेवले होते.’