मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने २०१८ मध्ये केलेल्या दोन परदेश दौऱ्यात सपाटून मार खाल्ला. सामन्यातील कामगिरी बरोबरच सराव सामन्याप्रती संघाची असलेली मानसिकता चर्चेचा विषय ठरली होती. इंग्लंड मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चिला जात आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCCI ) एक विनंती केली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघासाठी सराव सामन्याचे आयोजन करावे अशी विनंती संघ व्यवस्थापनाने केली असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वा कर्णधार विराट कोहलीने सराव सामन्यांची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. मात्र, शास्त्री यांनी आपण सराव सामन्यांना कधीच विरोध केला नसल्याचे स्पष्ट केले.
शास्त्री म्हणाले की,''ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी अधिक सराव सामन्यांचे आयोजन करण्यात यावे, अशी विनंती बीसीसीआयकडे केली आहे. पण, भरगच्च वेळापत्रकात सराव सामन्यांना तारखा मिळतील का, हे पाहावे लागेल. हा मोठा प्रश्न आहे.'' भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरूवात 21 नोव्हेंबरपासून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. त्यानंतर दहा दिवसांनी कसोटी मालिका सुरू होईल.
'' कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी आम्ही तीन-चार दिवसीय दोन सराव सामने खेळू इच्छितो, परंतु त्यासाठी आमच्याकडे वेळ आहे का? कसोटी मालिकेपूर्वी आम्हाला टी-20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर केवळ दहा दिवसांचा वेळ मिळणार आहे. या गोष्टींना आधिच मान्यता देण्यात आली आहे आणि या गोष्टी आमच्या हातात नसतात,'' असे शास्त्री म्हणाले.