भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी कठीण काळात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना साथ दिली आहे. बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या वार्षिक करारातून वगळले आहे. या दोघांनीही बोर्डाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे BCCIने इशान आणि श्रेयस यांना केंद्रीय कारातून बाहेर केले. बोर्डाने दोघांनाही रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यास सांगितले होते, पण दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. BCCIने जाहीर केलेल्या ३० करारबद्ध खेळाडूंच्या यादीत या दोघांची नावे नाहीत. मागच्या वेळेस श्रेयसला बी ग्रेड, तर इशानला सी ग्रेड कॉन्ट्रॅक्ट होता.
रवी शास्त्री यांनी ट्विट केले की, ''क्रिकेटमध्ये पुनरागमन हे या खेळाचे स्पीरिट परिभाषित करते. श्रेयस अय्यर आणि इशान किशन, धीर धरा. आव्हानांचा सामना करा आणि आणखी दमदार पुनरागमन करा. तुमची भूतकाळातील कामगिरी मोठ्या प्रमाणात बोलकी आहे आणि मला शंका नाही की तुम्ही पुन्हा एकदा शीर्षस्थानी असाल.''
२५ वर्षीय इशानने वैयक्तिक कारणांमुळे गेल्या डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्यानंतरही रणजी करंडक स्पर्धेत झारखंडकडून खेळण्याचे टाळले. त्याऐवजी पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या तयारीवर त्याने भर दिला.