भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली. भारतीय संघाचा आधी पाकिस्तानने आणि नंतर न्यूझीलंडने धुव्वा उडवला. त्यामुळे भारताची सुरूवात अतिशय खराब झाली आणि त्यातून सावरायला टीम इंडियाला संधी मिळाली नाही. विश्वचषकातील भारताच्या एक्झिटनंतर विराट कोहली टी२० कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्यासोबतच रवी शास्त्रीदेखील मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेतून मुक्त झाले. मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर रवी शास्त्री आता समालोचकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी एका मुलाखतीत त्याबद्दल सांगितलं. त्याच मुलाखतीतील त्यांच्या एका वक्तव्यावरवर भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी शास्त्री यांनी लोढा समितीच्या शिफारसींमध्ये असलेल्या लाभाच्या पदाबाबतच्या (conflict of interest) नियमावर वक्तव्य केलं होते. त्याच मुद्द्याला धरून मदल लाल यांनी मत मांडलं. "रवी शास्त्री जे काही बोलले त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. लोढा समितीच्या शिफारसींमधील दोन नियम हे खूपच विचित्र आहेत. पहिला म्हणजे लाभाच्या पदाबाबतचा नियम. असले नियम तर सरळ कचऱ्याच्या डब्यातच टाकले पाहिजेत. कारण अशा नियमांमुळे फारच समस्या ओढवतात आणि जे लोक संपर्कात राहू शकतात त्यांनाच दूर लोटलं जातं. उलट अशा पदांवर माजी क्रिकेटपटूंना नियुक्त केलं तर ते खेळाच्या भविष्यासाठी खूप चांगलं ठरलं", असं मदन लाल म्हणाले.
"दुसरा नियम म्हणजे वयोमर्यादा. वयाची मर्यादा जी ६० वरून ६५ करण्यात आली आहे, ती खरं पाहता ७० वर्षांपेक्षाही जास्त असायला हवी. क्रिकेटर्स हे फिट असतात आणि दीर्घकाळासाठी आपले कर्तव्य बजावू शकतात. क्रिकेट बोर्डावर चांगली लोकं असणं आवश्यक आहे. आपल्या क्रिकेट बोर्डाने आतापर्यंत अनेक चांगले प्रशासक पाहिले आहेत. त्यापैकी अनेकांनी केवळ चांगलं कामच केलं नाही तर बोर्डाला एक श्रीमंत संस्थादेखील बनवलं आहे", असंही मदन लाल यांनी नमूद केलं.
Web Title: Ravi Shastri Conflict of Interest Rule Former Indian Cricketer Madan Lal says Throw into the dustbin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.