मुंबईः वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षक बदलाच्या हालचालींनी जोर धरला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पण, तत्पूर्वी कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत 45 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांच्या फळीत बरेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रवी शास्त्री यांचे पद धोक्यात आल्याची चर्चा आहे. पण, खरचं शास्त्रींना हे पद सोडावे लागेल का?
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या मार्गदर्शनाखालील त्रिसदस्यीत समिती मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशिसकीय समितीनं टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीत कपिल देव यांच्यासह माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. या समितीतील गायवकाड यांनी शास्त्री यांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ''टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख पाहता शास्त्री यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यामुळे शास्त्री वगळता अन्य पदांसाठी पर्याय निवडण्याचा मार्ग मोकळा आहे. या पदांसाठी बीसीसीआयनं नेमलेल्या अटींची जो पूर्तता करेल, त्याची निवड होईल.''आतापर्यंत मुख्य प्रशिक्षकपदासाठी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हसेन आणि भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग यांनी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण पदावर कायम राहतील, असे संकेत मिळाले असून फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची गच्छंती ठरली आहे. द. आफ्रिकेचा दिग्गज जाँटी ऱ्होड्स याच्यासह अनेक दावेदार असले तरी क्षेत्ररक्षणासाठी श्रीधर यांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 20 महिन्यात अरुण यांचे काम चांगले झाले. सध्याचा भारतीय मारा कसोटीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह फॉर्ममध्ये आहेत. याचे श्रेय अरुण यांना जाते. निवडकर्ते त्यांच्याऐवजी अन्य कुणाला प्राधान्य देण्याची शक्यता नाही. बांगर मात्र, 4 वर्षे पदावर राहूनही बलाढ्य मधली फळी उभी करू शकले नाहीत. बांगर येण्याआधीपासूनच रोहित व कोहली चांगली कामगिरी करीत होते. मधल्या फळीचे अपयश वर्ल्ड कप स्पर्धेत चव्हाट्यावर आले.