नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय गोलंदाज कुलदीप यादवबाबत केलेले वक्तव्य आणि त्यामुळे दुखावलेला अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या प्रतिक्रियेमुळे भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले. ‘कुलदीपवरील माझ्या त्या वक्तव्याने अश्विनला वाईट वाटले असेल, तर मला आनंद आहे. मी ते वक्तव्य केले,’ असे मत रवी शास्त्री यांनी मांडले.
एका मुलाखतीत शास्त्री म्हणाले, ‘माझं काम प्रत्येकाला चांगलं वाटेल असं नाही. माझे काम कुठल्याही अजेंड्याशिवाय तथ्य समोर ठेवणे हे आहे. कुलदीपवरील माझ्या वक्तव्याने अश्विनला वाईट वाटले असेल, तर मला आनंद आहे. मी ते वक्तव्य केले. मी त्याला काही तरी वेगळे करायला लावले.’
शास्त्री पुढे म्हणाले, ‘अश्विनने त्याला बसखाली फेकून दिल्याबाबतीत काळजी करू नये. कारण मी बसचालकाला २-३ फूट दूरच थांबायला सांगितले होते.’ कुलदीपवर केलेले ते वक्तव्य केवळ एका तरुण गोलंदाजाला प्रोत्साहन देण्यासाठी होते. सिडनीतील सामन्यात अश्विन खेळला नाही आणि कुलदीपने खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे मी कुलदीपला एक संधी दिली हे अगदी रास्त आहे. याने अश्विन दुखावला असेल तर मला खूप आनंद आहे.’
...तर तुम्ही काय कराल?
‘तुमच्या प्रशिक्षकाने तुम्हाला आव्हान दिले तर तुम्ही काय कराल? रडत घरी जाल आणि मी परत येणार नाही म्हणाल? एक खेळाडू म्हणून मी ते आव्हान घेईन आणि माझ्याबाबत प्रशिक्षक कसा चुकीचा आहे हे सिद्ध करेन,’ असे शास्त्री म्हणाले. अश्विनने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या एका मुलाखतीत , ‘२०१९ मध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध रवी शास्त्री यांनी कुलदीपला विदेशातील मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणारा भारताचा अव्वल फिरकीपटू, असे संबोधले. तेव्हा मला कुणी तरी चिरडून टाकल्यासारखे वाटले. कुणी तरी मला बसखाली फेकून दिल्यासारखे वाटले,’ असा खुलासा केला होता.
Web Title: ravi shastri explanation if r ashwin felt bad about that statement then i am happy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.