मुंबई - यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीपूर्वीच संपुष्टात आले होते. त्यातील पाकिस्तानकडून झालेला पराभव क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला होता. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी-२० विश्वचषकात संघाची झालेली वाईट कामगिरी आणि पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाबाबत अखेर मौन सोडले आहे.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी टी-२० विश्वचषकामध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाबाबत सांगितले की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी वेगळी अशी तयारी केली जात नाही. गेल्या २० वर्षांमधील निकाल पाहिले तर आमच्याकडे ९० टक्क्यांहून अधिक सामने जिंकण्याचे रेकॉर्ड आहे. एखाद्या दिवशी काहीही होऊ शकते. मात्र एक किंवा दोन पराभवांमुळे काही का बदलावं?
यापूर्वी रवी शास्त्री म्हणाले होते की, विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडू सुमारे ६ महिन्यांपर्यंत बायो सिक्योर बबलमध्ये राहिल्यानंतर मानसिक आणि शारीरिकदृष्टा थकलेले होते. तसेच आयपीएल आणि टी-२० विश्वचषकादरम्यान फार कमी वेळ मिळाल्याने खेळाडूंना तयारी करण्यास फार मदत मिळाली नाही.
टी-२० विश्वचषकामध्ये धोनीला संघाचा मेंटॉर बनवण्यात आले होते. त्यावरही रवी शास्त्री यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, जेव्हा धोनीचे नाव मेंटॉर म्हणून जाहीर करण्यात आले. तेव्हा मी त्यावर फार विचार केला नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीपेक्षा चपळ बुद्धिमत्ता असलेला कुणीही खेळाडू नाही आहे. मी त्याला जवळून ओळखतो. तसेच जर खेळाच्या भल्यासाठी काही केले गेले तर ते का करू नये. तर दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या हार्दिक पांड्याबाबत रवी शास्त्री म्हणाले की, जर हार्दिक पांड्याने थोडा ब्रेक घेतला आणि फिटनेसवर मेहनत घेतली तर ते भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकते. तो टी-२० क्रिकेटमध्ये तुम्हाला चार षटके देऊ शकतो.