Ravi Shastri, former Head Coach of Indian Cricket Team - भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांच्यासमोर पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. या स्पर्धेत फलंदाज, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्व आघाड्यांवर टीम इंडिया अव्वल राहिली आहे. भारताने १० सामन्यांत अपराजित मालिका कायम राखली आहे आणि १९ नोव्हेंबरला यजमान वर्ल्ड कप जिंकतील असा विश्वास टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) व्यक्त केला आहे. भारतीय संघाने १९८३, २००३, २०११ व २०२३ अशी चारवेळा वर्ल्ड कप फायनल गाठली आहे. १९८३ मध्ये कपिल देव आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप उंचावला होता.
२००३मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते आणि तो वचपा काढण्याची संधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला आहे. या स्पर्धेत रोहित शर्माा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांची फटकेबाजी आणि मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा यांची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाचा पालापाचोळा करतेय. विराटने १० सामन्यांत ७११ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने १० सामन्यांत ५५च्या सरासरीने ५५० धावा कुटल्या आहेत. श्रेयस अय्यरनेही ५२६ धावा केल्या आहेत. लोकेश राहुल ( ३८६) व शुबमन गिल ( ३४६) यांचीही बॅट चांगली तळपली आहे.
मोहम्मद शमीने या स्पर्धेत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह ( १८), रवींद्र जडेजा ( १६), कुलदीप यादव ( १५) व मोहम्मद सिराज ( १३) यांनीही हा वर्ल्ड कप गाजवला आहे. भारतीय संघ फायनल खेळण्यापूर्वी रवी शास्त्री म्हणाले की, ''हा वर्ल्ड कप भारतीय संघच जिंकणार. त्यांनी या स्पर्धेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून सुरूवात केली आणि ते फायनलमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी सपूर्ण स्पर्धा गाजवली आहे आणि फायनलमध्ये त्यांना काही वेगळं करण्याची गरज नाही. मागील काही सामन्यांत जसा खेळ केलाय, तसाच फायनलमध्ये त्यांनी करावा. या संघाची खासियत अशी आहे की हा संघ एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून नाही. या संघात ८-९ खेळाडू आहेत, जे सातत्याने दमदार कामगिरी करत आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे.''
Web Title: Ravi Shastri, former Head Coach says, "India will win the World Cup, The good thing is that this team doesn't depend on one or two players''
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.