नवी दिल्ली, भारत विरुद्ध इंग्लंड : विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताला इंग्लंडमधील कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीपुढे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हजर व्हावे लागले. यावेळी शास्त्री यांनी पराभवाचे दिलेले कारण हास्यास्पद ठरत आहे.
इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत कोहली वगळता भारताच्या एकही फलंदाजाला सातत्यापूर्ण कामगिरी करता आली नव्हती. तरीही शास्त्री यांनी या पराभवासाठी कोणत्याही खेळाडूला दोषी ठरवलेले नाही.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांमध्ये भारताला चार सामने गमवावे लागले होते. या पराभवाचे खापर शास्त्री यांनी नाणेफेकीवर फोडले आहे. भारताला पाचही सामन्यात नाणेफेक जिंकता आली नव्हती. त्यामुळे नाणेफेक ही एखाद्या संघाला जिंकण्यासाठी खेळाडूपेक्षा मोठी ठरते, असा शास्त्री यांच्या विधानाचा अर्थ काढायचा का, असा सवाल चाहते विचारत आहेत. त्याचबरोबर नाणेफेक जर महत्त्वाचा असेल आणि भारत पाचही नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला नसेलल तर भारतीय संघ एकमेव कसोटी सामना कसा काय जिंकला, याचे उत्तरही शात्री यांनी द्यायला हवे.