मुंबई : सध्याच्या घडीला भारतीय संघाचे गुरु म्हणजेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. पण बीसीसीआयने आता भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला आता सुपर गुरु बनवले आहे. त्यामुळे या गोष्टीचा संघावर परीणाम होणार का, याचा विचार काही चाहते करत आहेत.
द्रविडने यापूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने विश्वचषकाला गवसणी घातली होती. त्यामुळे द्रविड खेळाडूंवर कसे संस्कार करतो, हे बीसीसीआयला चांगलेच माहिती आहे. त्यामुळेच बीसीसीआयने द्रविडला ही मोठी जबाबदारी दिली असल्याचे समजत आहे. सध्याच्या घडीला द्रविडकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने आता द्रविडवर ही अतिरीक्त जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयने द्रविडवर विश्वास ठेवला असून तो आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवणार का, याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेले असेल. कारण द्रविडला सोपवलेली ही जबाबदारी क्रिकेट विश्वावर परीणाम करणारी आहे.
बीसीसीआयने द्रविडवर आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. द्रविडला आता तब्बल सोळा देशांतील युवा खेळाडूंना मार्गदर्शन द्यावे लागणार आहे. बीसीसीआय या 16 देशांतील युवा खेळाडूंना भारतामध्ये बोलवणार आहे. त्यानंतर त्यांना द्रविड मार्गदर्शन करणार आहे. या सोळा देशांमध्ये कॅमेरून, केनिया, मॉरिशियस, नामिबिया, नायजेरिया, रवांडा, युगांडा, झांबिया, मलेशिया, बोस्तावना, सिंगापूर, जमैका, त्रिनिदाद अँड टोबॅगो, फिजी, टांझानिया आणि मोझांबिक्यू या देशांचा समावेश करण्यात आला आहे. या 16 देशांमधून 18 मुलांना आणि 17 मुलींना या मार्गदर्शनासाठी निवडण्यात आले आहे.
लंडनमध्ये राष्ट्रकुल खेळांची एक बैठक 19 एप्रिल 2018 या दिवशी झाली होती. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 देशांतील खेळाडूंसाठी मार्गदर्शन शिबीर भारतात घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे बीसीसीआयला हे शिबीर भरवायचे आहे.