काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये तीन नावं चांगलीच चर्चेत आहेत; सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि रवी शस्त्री. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यावर शास्त्री यांना थोडा धक्का बसल्याचे म्हटले जात होते. पण जो माणूस चोख काम करतो, त्याला कसलीही भीती नसते. शास्त्री यांच्या एका माजी सहकाऱ्याने रवी शस्त्री त्यांचं काम चोखपणे करतात, असे विधान केले आहे.
मुंबईचा माजी महान फलंदाज अमोल मुझुमदारने भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाच्या एका कार्यक्रमात खास दैनिक लोकमतसाठी मुलाखत दिली. शास्त्री मुंबईचे कर्णधार होते, तेव्हाचा एक किस्सा निघाला. त्यावर या खास मुलाखतीमध्ये अमोलने शास्त्री यांच्याकडे एक खास कला आहे, असेही नमुद केले. अमोल म्हणाला की, रवी शास्त्री यांचा इफेक्ट संघावर नक्कीच जाणवतो. संघाचे मनोबल उंचावण्याची त्यांच्याकडे एक कला आहे. ते त्यांचे काम चोखपणे करतात. ते एक व्यावसायिक प्रशिक्षक आहेत.
अमोलने काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे फलंदाजी प्रक्षिकपदही सांभाळले होते. तेव्हा शास्त्री आणि अमोल हे जुने सहकारी आमने-सामने आले होते. या दौऱ्यातील अनुभवाबद्दल अमोल म्हणाला की, माझ्यासाठी हा दौरा फारच चांगला होता. समाधान देणारा होता. एका आंतरराष्ट्रीय संघाबरोबर मी जोडला गेलो होतो. या अनुभवातून बरेच काही शिकता आले, या अनुभवाचा फायदा यापुढे मला नक्कीच होईल.
मुंबईच्या संघाची घसरण झालेली नाही मुंबईच्या संघाची घसरण झालेली नाही. कारण मुंबईचे बरेच खेळाडू अपल्याला भारताच्या संघात दिसत आहेत. मुंबई गेल्यावर्षी विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. मुंबईची घसरण झाली, हे बोलायची सवय झाली आहे. एखादा संघ प्रत्येक स्पर्धा जिंकू शकत नाही.
मुंबईच्या रक्तात खडूसपणा आहे?मुंबईच्या रक्तात सध्या खडूसपणा आहे की नाही, हे मला सांगता येणार नाही. आम्ही ज्यावेळी खेळायचो ते रक्तच वेगळे होते. माझ्यातही तो खडूसपणा होता. जे बोलायचो ते करून दाखवण्याची धमक होती. त्यामुळेच तो खडूसपणा रक्तात होता, असे आपण म्हणू शकतो.