Ravi Shastri Interview: भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० संघाच्या नेतृत्त्वात आणि मुख्य प्रशिक्षपदाच्या बाबतीत आता मोठे बदल झाले आहेत. गेल्या ४ वर्षांपासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदाची जबाबदारी भूषवणाऱ्या रवी शास्त्री (Ravi Shatri) यांचा कार्यकाळ ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर संपला. याशिवाय गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघाचं क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नेतृत्त्वा सांभाळण्याऱ्या विराट कोहलीनंही ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडलं आहे. कोहलीच्या जागी आता रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच कोहलीनं वर्ल्डकपनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यावेळी कोहलीनं वर्कलोड मॅनेजमेंट आणि क्रिकेटच्या इतर प्रकारात लक्षं केंद्रीत करण्याचं कारण दिलं होतं. पण यामागचं खरं कारण आता संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितलं आहे. शास्त्रींनी एका मुलाखतीत केलेल्या एका वक्तव्यातून संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सारंकाही आलबेल नव्हतं याकडे इशारा करत आहे.
चार वर्षांपासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदाची धुरा सांभाळलेल्या रवी शास्त्री यांनी त्यांच्या कार्यकाळात संघात अनेक उतार-चढाव पाहिले. यात संघाच्या कामगिरीसोबत संघावर केलेली जाणारी टीका आणि अफवांचाही समावेश आहे. भारतीय संघातील सिनिअर खेळाडू आणि इतर खेळाडूंमध्ये समन्वय नसल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. यात काही खेळाडूंचं एकमेकांशी पटत नसल्याचंही वृत्त समोर आलं होतं. पण त्यावेळी संघातील कोणत्याही खेळाडूंन किंवा बीसीसीआयकडून कधीच कोणतं वक्तव्य केलं गेलं नाही. आता रवी शास्त्रींनी केलेल्या विधानामुळे त्यावेळी समोर आलेल्या बातम्यांना आता दुजोरा मिळताना दिसत आहे.
ड्रेसिंग रुममध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा...भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि संघातील सिनिअर खेळाडूंमध्ये पटत नसल्याच्या बातम्या गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्यानं समोर आल्या होत्या. पण आता ट्वेन्टी-२० संघाचं कोहलीनं नेतृत्त्व सोडण्यामागे देखील खरं कारण तेच असल्याचं शास्त्री यांनी त्यांच्या विधानातून खुणावलं आहे. रवी शास्त्री यांनी नुकतंच रिपब्लिक टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली. यात कोहलीच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याच्या निर्णयाबाबत विचारण्यात आलं असता शास्त्रींनी सविस्तर खुलासा केला आहे.
कोहलीनं ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्यामागे खरंच वर्कलोड मॅनेजमेंट हेच कारण होतं का? की रवी शास्त्री यांनाच संघाच्या प्रशिक्षपदी कायम ठेवावं या मागणीसाठी कोहलीनं राजीनामा दिला? असा प्रश्न शास्त्रींना विचारण्यात आला होता.
"मला या दोघांपैकी एकही कारण योग्य वाटत नाही. ड्रेसिंग रुममध्ये कधी कधी एकमेकांमध्ये वाद होत असतात. तेव्हा तुमचं प्रत्येकाशी पटतंच असं नाही. मग तिथं मी किंवा कोहली देखील असू शकतो. अशावेळी एकाला पुढाकार घ्यावा लागतो. जेव्हा काही गोष्टी योग्य होत नसतात आणि त्याचा संघाला त्रास होऊ नये म्हणून एका व्यक्तीला पुढाकार घ्यावा लागतो. अशावेळी सर्वात चांगला मार्ग म्हणजे एकानं बाजूला होणं", असं शास्त्री म्हणाले. तसंच "समजा माझ्यात आणि कोहलीमध्ये काही पटत नसेल तर यात जास्तकाळ अडकून न राहता संघाचा आणि भविष्याचा विचार करुन एकानं बाजूला हटणं योग्य असतं", असं उदाहरण देखील शास्त्रींनी यावेळी दिली. दरम्यान, शास्त्रींनी यावेळी संघातील कोणत्याही खेळाडूचं नाव या घेतलेलं नाही.
कोहली आणि रोहितमध्ये वादाची माहिती आली होती समोर२०१९ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतील भारतीय संघाच्या पराभवानंतर संघात वाद असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावेळी विराट आणि रोहित यांच्या आलबेल नसल्याचा दावा करण्यात आला होता. संघातील काही खेळाडू रोहितसोबत तर काही खेळाडू विराटच्या बाजूनं असल्याचं सांगितलं गेलं होतं. इतकंच नव्हे, तर कोहली आणि संघातील वरिष्ठ खेळाडू रवीचंद्रन अश्विन यांच्यातही पटत नसल्याचं बोललं गेलं होतं. दोघांमधील वादामुळेच अश्विनला इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत संधी दिली गेली नव्हती असंही बोललं गेलं होतं.