दुबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघानं काल नामिबियावर विजय मिळवला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा हा अखेरचा सामना होता. या सामन्यानंतर शास्त्रींना संघातील खेळाडूंशी संवाद साधत सर्वांचे आभार मानले. ५९ वर्षांचे शास्त्री पुढे काय करणार याबद्दल आता उत्सुकता आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षण होण्यापूर्वी रवी शास्त्री समालोचक म्हणून कार्यरत आहे. 'इन द एअर, श्रीशांत टेक्स इट, इंडिया विन्स' हे रवी शास्त्रींचे शब्द भारतीयांना आजही आठवतात. भारतानं पाकिस्तानला नमवून २००७ मध्ये पहिलावहिला टी-२० विश्वचषक पटकावला, त्यावेळी शास्त्रीच समालोचन करत होते. २०११ मध्ये भारतानं श्रीलंकेला नमवत तब्बल २८ वर्षांनी विश्वचषक जिंकला, त्यावेळीही शास्त्रीच समालोचक होते. आता पुन्हा एकदा शास्त्री त्याच भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
भारतानं काल नामिबियाचा पराभव केल्यानंतर शास्त्रींनी संघातील खेळाडूंशी संवाद साधला. त्यावेळी भविष्यातील योजनांबद्दल त्यांनी काही महत्त्वाचे संकेत दिले. 'ऑस्ट्रेलियन संघाच्या त्यांच्याच देशात जाऊन पराभूत करणं माझ्या कारकिर्दीतील मोलाचा क्षण होता. आम्ही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही पुढे आहोत. पुढल्या वर्षी या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना होईल. कदाचित मी त्यावेळी समालोचन करेन,' असं शास्त्री म्हणाले.
सप्टेंबरमध्ये भारताला इंग्लंडविरुद्धचा कसोटी दौरा अर्धवट सोडावा लागला. भारतीय संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना पुढे ढकलावा लागला. पुढल्या वर्षी हा सामना खेळवण्यात येईल. आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश झाला आहे. त्यातील एका संघासाठी शास्त्री प्रशिक्षण म्हणून काम करू शकतात अशीही चर्चा आहे.