Join us

Ravi Shastri: गर्लफ्रेंड, अफेअर, लग्न अन् दादा कोंडके...रवी शास्त्रींनी दिली बिनधास्त उत्तरं; पाहा Video

भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) एक असं व्यक्तीमत्व आहे की जे हटके आणि तितक्याच बिनधास्तपणासाठी ओळखले जातात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 14:43 IST

Open in App

भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) एक असं व्यक्तीमत्व आहे की जे हटके आणि तितक्याच बिनधास्तपणासाठी ओळखले जातात. बेधडक वक्तव्यांनी त्यांनी अनेकदा वाद देखील ओढावून घेतलेला आहे. कोणतीही गोष्ट कुणालाही न घाबरता आणि त्यामुळे कोणता वाद निर्माण होईल याचा विचार न करता ते स्पष्ट बोलणं नेहमी पसंत करतात. शास्त्रींचा हाच स्पष्टवक्तेपणा आजवर अनेकांना भावला देखील आहे. रवी शास्त्रींचा हाच स्पष्टवक्तेपणा आताच नव्हे, तर त्यांच्या करिअरच्या उमेदीच्या काळात देखील असाच होता. 

रवी शास्त्री आता भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी नाहीत. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पण त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात रवी शास्त्री बिनधास्त आणि बेधडकपणे एका पत्रकारानं घेतलेल्या मुलाखतीला सामोरं जाताना दिसत आहेत. मुलाखतीत रवी शास्त्री यांनी त्यांच्या अफेअरबाबत बिनधास्तपणे कबुली दिली. तसंच बॉलीवूड कनेक्शन, लग्न या गोष्टींवरही बेधडक भाष्य केलं. रवी शास्त्री त्यावेळी बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंह यांना डेट करत होते. याचीही कबुली शास्त्रींनी मुलाखतीत दिली. अमृता सिंहसोबतचं अफेअर ते लग्न अशा सर्वबाबतीत त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली. याशिवाय त्यांनी त्यांची आवडती अभिनेत्रीचाही खुलासा केला होता. तसंच आवडता अभिनेत्याबाबत विचारलं असता त्यांनी दादा कोंडके यांचं नाव घेतलं होतं. तसंच 'अंधेरी रात में, दिया तेरे हाथ मैं' हा दादा कोंडकेंचा चित्रपट पाहिल्याचंही त्यांनी सांगितलं. 

अमृता सिंहसोबतच्या अफेअरबाबत केली दिलखुलास चर्चाशास्त्री त्यांच्या करिअरच्या उमेदीच्या काळात देशातील मोस्ट एलिजेबर बॅचलर म्हणून ओळखले जात होते. उंच तरणाबांड तरुण आणि हटके स्टाइलमुळे त्यांची फॅन फॉलोइंग देखील कमालीची होती. शास्त्री त्यावेळी अभिनेत्री अमृता सिंह हिला डेट करत होते. तर ही गोष्ट त्यांनी कधीच लपवणं पसंत केलं नाही. ते दिलखुलासपणे याबाबत बोलायचे. रवी शास्त्रींना अमृता सिंह खूप आवडायच्या आणि पहिल्याच भेटीत त्यांची बोलती बंद झाली होती. 

"जेव्हा मी पहिल्यांदा माझी गर्लफ्रेंड अमृताला भेटलो. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो. मी मुलींशी बोलायला खूप लाजायचो. पण असा कधीच विचार केला नव्हता की एक दिवस असाही येईल की मला १० मिनिटं एकही शब्द बोलायला मिळणार नाही. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा फक्त तीच बोलत होती. मी काहीच बोललो नाही. हाच माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा लाजीरवाणा प्रसंग होता", असं रवी शास्त्री म्हणतात. 

शास्त्रींना पसंत होत्या स्मिता पाटीलरवी शास्त्रींना जेव्हा आवडत्या अभिनेत्रीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचं नाव घेतलं. तसंत अमृता सिंहचा एकही चित्रपट पाहिलेला नसल्याचीही प्रांजळ कबुली त्यांनी दिली होती. तसंच स्मिता पाटील यांचा मंथन चित्रपट पाहिला होता असंही मुलाखतीत सांगितलं आहे. "स्मिता पाटील माझ्या सर्वात आवडत्या अभिनेत्री होत्या. दुर्दैवानं त्या आपल्यासोबत नाहीत. पण मला त्या खूप आवडायच्या. त्यांचं निधन झालं त्यादिवशी मी खूप निराश होतो. त्यांच्या जाण्यानं आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान झालं", असंही शास्त्री म्हणाले. 

दादा कोंडके आवडते अभिनेतेरवी शास्त्री यांना आवडत्या अभिनेत्याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचं नाव घेतलं. "दादा कोंडके कमालीची अभिनेते आहेत. 'दिया तेरे हाथ में' नावाचा त्यांचा चित्रपट मी पाहिला होता. तसंच नसरुद्दीन शाह देखील माझे आवडते अभिनेते आहेत", असं रवी शास्त्री म्हणाले होते. 

टॅग्स :रवी शास्त्रीअमृता सिंगदादा कोंडकेभारतीय क्रिकेट संघ
Open in App