मुंबई - नुकत्याच संपलेल्या 2019 या वर्षात विश्वचषकातील उपांत्य सामना वगळता भारतीय क्रिकेट संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. आता सरलेले वर्ष हा इतिहास बनला असून, नव्या वर्षात भारतीय संघाला नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियात होणार टी-20 विश्वचषकाचे आव्हान सर्वात मोठे असेल. नव्या वर्षात भारतीय संघाप्रमाणेच कर्णधार विराट कोहलीकडूनही क्रिकेटप्रेमींना खूप अपेक्षा आहेत. दरम्यान, नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्री यांनी विराट कोहलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. विराटची कामगिरी दिवसाणगिक उंचावत आहे, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. विराट कोहलीकडून मर्यादित षटकाच्या क्रिकेट एवढेच कसोटी क्रिकेटला देण्यात येणाऱ्या प्राधान्याबाबत रवी शास्त्री म्हणाले की, ''भारतीय क्रिकेटच नाही तर जागतिक क्रिकेटचा विचार केल्यास एक क्रिकेटपटू प्राधान्यक्रमाने कसोटी क्रिकेटचा प्रचार प्रसार करत आहे तो म्हणजे विराट कोहली. त्याला कसोटी क्रिकेट आवडते आणि तो त्याचा संपूर्ण आनंद घेतो.'' विराटच्या या भूमिकेचा कसोटी क्रिकेटलाही फायदा होणार असल्याचे शास्त्रींना वाटते. ''जेव्हा एखादा लहान मुलगा कसोटी क्रिकेट पाहत असेल. तेव्हा तो पाहील की एक सुपरस्टार खेळाडू कसोटी क्रिकेटा प्राधान्य देतय. तेव्हा तो मुलगासुद्धा त्याचे अनुकरण करेल. मग तो मुलगा ऑस्ट्रेलियातील असो किंवा इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका किंवा अन्य कुठल्याही देशाचा असो.'' असे शास्त्री म्हणाले. भारतीय क्रिकेट संघ हा नव्या वर्षात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, जसप्रीत बुमरा आणि अन्य वेगवान गोलंदाजांच्या उपस्थितीत भारतीय संघ परदेशात विजय मिळवू शकेल, असे शास्त्रींना वाटते. तसेच संघाकडील वेगवान गोलंदाजीचे आक्रमण पाहता भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थान कायम राखेल, असा विश्वासही शास्त्री यांनी व्यक्त केला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दिवसागणिक विराट कोहलीची कामगिरी उंचावतेय, रवी शास्त्रींकडून कौतुक
दिवसागणिक विराट कोहलीची कामगिरी उंचावतेय, रवी शास्त्रींकडून कौतुक
नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्री यांनी विराट कोहलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 6:27 PM