Join us  

सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदावर प्रथमच रवी शास्त्रींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यापासून सर्वांना उत्सुकता लागली होती ती टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रतिक्रियेची...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:22 PM

Open in App

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यापासून सर्वांना उत्सुकता लागली होती ती टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रतिक्रियेची... गांगुली आणि शास्त्री यांच्यातील संबंध तितके चांगले नाहीत आणि अनेकदा त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळेच शास्त्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस शास्त्रींनी मत व्यक्त केले. गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होणे म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी विजयाचा दिवस असं म्हणावं लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केलं.

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीत सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह गांगुली सदस्य होता. त्यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनील कुंबळेला पसंती दर्शवली होती. त्यावरून शास्त्रींनी सल्लागार समितीवर टीका केली होती. त्यानंतर अनेक वेळा गांगुली आणि शास्त्री यांच्यात कटूता असल्याचे जाणवले होते. 24 ऑक्टोबरला जेव्हा गांगुलीनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान होताच पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हाच काही कठोर पाऊले उचलली जातील, असे संकेत दिले होते.  

त्यामुळे शास्त्रींच्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले,'' बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौरव गांगुलीचे मनापासून अभिनंदन. भारतीय क्रिकेटची वाटचाल योग्य दिशेनं चालली असल्याचं हे प्रतिक आहे. गांगुली लिडर आहे. गांगुलीकडे क्रिकेट प्रशासनाचा 4-5 वर्षांचा अनुभव आहे आणि अशी व्यक्ती जेव्हा बीसीसीआयचा अध्यक्ष होते, तेव्हा भारतीय क्रिकेटचा तो विजय असतो. बीसीसीआय सध्या अडचणीत आहे आणि बरीच कामं व्हायची आहेत. गांगुलीला शुभेच्छा.'' 

यावेळी शास्त्रींनी गांगुलीचे गोडवे गायले. ते म्हणाले,''गांगुली नेहमी खेळाडूंच्या पाठिशी उभा राहिला. त्यानं त्याच्या सहकाऱ्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवला. विराट कोहलीही याच पाऊलखुणांवर चालत आहे.''   

टॅग्स :रवी शास्त्रीसौरभ गांगुलीबीसीसीआय