भारत-इंग्लंड मालिकेतील पाचवा कसोटी सामना कोरोना व्हारयसमुळे रद्द करावा लागला अन् भारतीय खेळाडू आयपीएल २०२१साठी दुबईत दाखल होऊ लागले आहेत. चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रवी शास्त्री यांनी चौथ्या कसोटी दरम्यान एका पुस्तक प्रकाशनला हजेरी लावली होती आणि त्यात बरीच बाहेरची लोकं आली होती. या कार्यक्रमानंतरच टीम इंडियाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याची चर्चा सुरू आहे, परंतु रवी शास्त्री यांनी टीकाकारांना उत्तर दिले आणि पुस्तक सोहळ्याला जाण्याच्या कृतीचे समर्थन केले.
रवी शास्त्री यांच्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ योगेश परमार यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. फिजिओथेरपिस्ट डॉ नितीन पटेल यांनाही आयसोलेशनमध्ये जावे लागले. ''संपूर्ण देशात ( लंडन) लॉकडाऊन हटवला गेला होता. त्यामुळे पहिल्या कसोटीपासूनच काहीही घडले असते,''असे रवी शास्त्री यांनी Mid-day ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. भारतीय संघानं या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती आणि पाचवी व अंतिम कसोटीच्या काही तासापूर्वी बीसीसीआय आणि इसीबी यांनी हा सामना रद्द झाल्याचे जाहीर केले.
५९ वर्षीय शास्त्री यांना सुरू असलेल्या वादाची फिकीर नाही आणि त्यावर न बोलता त्यांनी भारतीय संघाच्या कामगिरीवर बोलणे अधिक पसंत केले. ''इंग्लंडच्या धर्तीवर टीम इंडियासाठीची ही दर्जेदार कामगिरी ठरली. भारतीय खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. कोरोना काळात भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये जी कामगिरी करून दाखवली, ती कोणत्याच संघानं केली नाही,''असे शास्त्री म्हणाले.