मुंबई : 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी ही रवी शास्त्री यांच्याकडेच असणार आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीनं शास्त्रींच्या नावावर शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. या शर्यतीत शास्त्रींना न्यूझीलंडचे माईक हेसन, भारताचे लालचंद राजपूत व रॉबीन सिंग, ऑस्ट्रेलियाचे टॉम मुडी यांचे आव्हान होते. पण, सल्लागार समितीनं अखेरीस शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली. हेसन आणि मुडी यांनी या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत शास्त्रींना कडवी टक्कर दिल्याचेही कपिल देव यांनी सांगितले. शास्त्रींची निवड झाल्यानंतर हेसन यांनी सोशल मीडियावर शास्त्रींचे अभिनंदन केले. शास्त्रींनीही हेसन यांच्या ट्विटला त्वरित उत्तर दिले.
शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पर्यंतच असणार आहे. त्यानंतर पुन्हा मुलाखती होतील. जुलै 2017 मध्ये रवी शास्त्री यांच्याकडे दुसऱ्यांदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडिया 21 कसोटी सामने खेळली आणि त्यापैकी 13 सामने जिंकली. वनडे सामन्यांचा विचार केल्यास, शास्त्री गुरुजींच्या कार्यकाळात झालेल्या 60पैकी 43 सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला. तसंच, टी-२० मध्येही 36 पैकी 25 सामन्यांत भारताने विजयोत्सव साकारला आहे. हे एक कारण त्यांच्या नियुक्ती मागचे आहे. पण या नियुक्तीमागे एक मोठे कारण असल्याचेही म्हटले जात आहे.