मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये रोहित शर्माची निवड न झाल्याने मोठा वाद निर्माण झाला. अनेक माजी क्रिकेटपटूंनी यावर आपल्या प्रतिक्रीया देताना निवड समितीवर टीका केली. मात्र आता भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शस्त्री यांनी रोहितच्या निवडीबाबत सांगितले की, ‘रोहितच्या दुखापतीबाबत अद्याप मला काही माहिती नाही. पण तो ऑस्ट्रेलियाला नाही आला, तर बरंच आहे.’
ऑस्ट्रेलिया दौºयासाठी निवडण्यात आलेल्या तिन्ही प्रकारच्या संघांमध्ये रोहितची निवड झाली नाही. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्येही दुखापतीमुळे रोहितला संघाबाहेर बसावे लागत आहे. गेल्या तीन सामन्यात तो खेळू शकला नाही. दखल घेण्याची बाब म्हणजे ज्यावेळी, बीसीसीआयने संघाची घोषणा केली, तेव्हा रोहितचा सराव सत्राचा व्हिडिओ मुंबई इंडिअन्सने सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यामुळे रोहितच्या दुखापतीवर प्रश्न निर्माण झाले होते.एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री म्हणाले की, ‘दुखापत होणे ही, कोणत्याही खेळाडूसाठी अत्यंत निराशाजनक असते. यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. अनेकदा दुखापतींना मागे टाकून तुम्ही खेळू इच्छिता, पण स्वत: खेळाडूलाच आपल्या पूर्ण तंदुरुस्तीबाबत पूर्ण माहिती असते.’आपला अनुभव सांगताना शास्त्री म्हणाले की, ‘मी स्वत: क्रिकेटपटू आहे. मी १९९१ मध्ये माझी कारकिर्द तेव्हा पूर्ण केली, जेव्हा मी ऑस्ट्रेलिया ला गेलो होतो. तिथे मी न जाता ३-४ महिन्यंचा ब्रेक घेतला असता, तर मी भारतासाठी आणखी ४-५ वर्षे क्रिकेट खेळलो असतो. त्यामुळेच मी अनुभवावरुन सांगतोय. हे प्रकरणही असेच आहे. हे अमिष आहे. रोहित एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्याने पूर्ण तंदुरुस्त झाल्याशिवाय दौºयावर जाऊ नये.’