Ravi Shastri slams Indian Batters, Ind vs Aus 5th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे होणार आहे. सध्या मालिकेत ४ सामन्यांनंतर भारत १-२ असा पिछाडीवर आहे. या कसोटीपूर्वी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांनी भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर रोखठोक भाष्य केले आहे. टीम इंडियाच्या खराब कामगिरीवरून त्यांनी रोहित शर्मा, विराट कोहली यांसह सर्वच फलंदाजांची कानउघाडणी केली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया बॅकफूटवर असल्याचे कारण शास्त्रींनी स्पष्ट केले.
बेजबाबदार फटके मारल्याने कामगिरी ढासळली...
टीम इंडिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा गतविजेता आहे. तर ऑस्ट्रेलिया २०१४-१५ पासून या ट्रॉफी विजेतेपदाची वाट पाहत आहे. शास्त्रीच्या म्हणण्यानुसार, टीम इंडियाचा मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्टमध्ये शेवटच्या दिवशी ज्या प्रकारे पराभव झाला, त्यामुळे ऑस्ट्रेलिया लवकर ही ट्रॉफी जिंकेल असे वाटते आहे. कारण भारतीय फलंदाजांची बेजबाबदार फटकेबाजी कारणीबूत आहे. खराब शॉट सिलेक्शन हे भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण आहे असे शास्त्रींनी सांगितले आहे.
ट्रॉफीवरील पकड सैल
रवी शास्त्री यांनी डेली टेलिग्राफमध्ये मांडलेल्या भूमिकेनुसार, मेलबर्न कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी खेळलेल्या खराब शॉट्सचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला. त्यांच्या मते, मधल्या सत्रात भारतीय फलंदाजांनी चांगले शॉट्स खेळले नाहीत. मालिकेत अजून एक कसोटी बाकी आहे. पण बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेवरील भारतीय संघाची पकड सैल होताना दिसत आहे.
सिडनीमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया कामगिरी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीमध्ये आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने फक्त १ जिंकला आहे. ५ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे, तर सिडनीमध्ये ७ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला सिडनीत खेळवण्यात येणारी शेवटची कसोटी जिंकणे आवश्यक आहे. पण, आकडेवारी आणि सध्याची कामगिरी पाहता टीम इंडिया हे करू शकणार का, हा मोठा प्रश्न आहे.