चेन्नई: ‘टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीची कमतरता जाणवेल. पण, या दोघांच्या अनुपस्थितीचा भारताने फायदाही घ्यावा. दोघांच्या अनुपस्थितीत भारताला नवे चॅम्पियन खेळाडू शोधण्याची संधी मिळेल,’ असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
दुखापतग्रस्त असल्याने बुमराह आणि जडेजा यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली असून बुमराह पाठदुखीमुळे त्रस्त आहे. दोघांच्या दुखापतीमुळे भारताच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. एका कार्यक्रमामध्ये शास्त्री यांनी सांगितले की, ‘बुमराह आणि जडेजा ऑस्ट्रेलियात नसणार आणि यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर निश्चित परिणाम होईल. पण त्याचवेळी, नवे चॅम्पियन खेळाडू शोधण्याची संधीही भारताला मिळेल. बुमराहची दुखापत दुर्दैवी आहे. अतिप्रमाणात क्रिकेट खेळले जात असल्याने खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. तो नक्कीच दुखापतग्रस्त आहे, पण त्याचवेळी अन्य खेळाडूसाठी ही एक संधीही आहे. दुखापतीच्या बाबतीत तुम्ही काही करु शकत नाही.’
बुमराहच्या जागी अद्याप कोणाची निवड झाली नाही. मात्र, जर मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त झाला, तर त्याची बुमराहच्या जागी निवड होऊ शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहेत. शमीकडे ऑस्ट्रेलियात खेळण्याचा असलेला अनुभव भारताला उपयोगी पडेल, असेही शास्त्री यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘शमीकडे ऑस्ट्रेलियात खेळण्याचा मोठा अनुभव आहे. भारताने गेल्या सहा वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक दौरे केले आणि यामध्ये शमीचा सहभाग होता. त्यामुळे त्याच्याकडे असलेला अनुभव मोलाचा ठरेल.’
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"