लंडन : क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रकावर भारताचे माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी भाष्य केले आहे. त्यांनी द्विपक्षीय टी-२० मालिका कमी करण्याची मागणी केली, शिवाय फ्रेंचाइजी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा सल्ला दिला आहे.
आयसीसीच्या भविष्यातील दौरा वेळापत्रकानुसार टी-२० क्रिकेट आयोजनात वाढ होणार आहे. आयपीएल अडीच महिने चालावी यासाठी वेगळी विंडो देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सामन्यांची संख्या वाढल्यामुळे खेळाडूंवर दडपण येत आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने ३१ व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याआधी द. आफ्रिकेने आपल्या टी-२० लीगसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली. शास्त्री यांनी कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी द्वितीय स्तरावरील स्पर्धेच्या आयोजनाची सूचना केली. असे न झाल्यास कसोटी क्रिकेट पुढील दहा वर्षांत संपून जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.