Ravi Shastri : रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबतचा प्रवास आज संपला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविड आता टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. नामिबियाविरुद्धच्या ( India vs Namibia) लढतीनंतर पत्रकार परिषदेला आलेले शास्त्री भावनिक दिसले. ''ड्रेसिंग रुममधून बाहेर पडताना मी भावनिक झालो होतो, परंतु अभिमानानं मी या पदावरून रजा घेत आहे, असे ते म्हणाले. यावेळी शास्त्री यांनी एका व्यक्तीचे खूप आभार मानले.
२०१४साली रवी शास्त्री यांची आठ महिन्यांकरीता भारतीय संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०१७मध्ये ते मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले आणि १६ ऑगस्ट २०१९मध्ये त्यांची फेरनिवड झाली. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ४३ कसोटींत २५ विजय व १३ पराजय पत्करले आहेत. ५ सामने बरोबरीत सुटले. ७६ वन डे पैकी ५१ विजय , २२ पराजय, तर ६५ ट्वेंटी-२०त ४३ विजय व १८ पराजय असा शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून प्रवास आहे. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत धुळ चारली. ७० वर्षांनंतर भारतीय संघआनं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई संघ ठरला. ४० महिने भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होता. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे मर्यादित षटकांची मालिका जिंकण्याचा पराक्रम.
रवी शास्त्री म्हणाले...''मी भरत अरूणला गुरू म्हणतो. त्याच्याकडे २० वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव आहे आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मी त्याला पाहिले होते, त्यामुळेच त्याची निवड केली. त्याच्याकडे चांगले संवाद कौशल्य आहे. आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, याचे वाईट वाटते. पण राहुल द्रविडला शुभेच्छा, तो दिग्गज खेळाडू आहे आणि भारतीय क्रिकेटसाठी त्यानं बरंच काम केलं आहे. यावेळी मी एन श्रीनिवासन यांचे विशेष आभार मानतो. 2014मध्ये त्यांनी मला संधी दिली, म्हणून मी इथे आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. सर तुम्ही पाहत असाल, तर तुमचे मनापासून आभार,''असे मत व्यक्त करून रवी शास्त्री यांनी CSKचे मालक श्रीनिवासन यांचे आभार मानले.
रोहित शर्माकडे ती क्षमता..विराट कोहलीनंतर टीम इंडियाच्या नव्या कर्णधाराबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, ''रोहित शर्माकडे क्षमता आहे आणि तो सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्याच्याकडे आयपीएलची पाच जेतेपदं आहेत. तो संघाला आणखी मोठी उंची गाठून देईल.''
आता पुढे काय?मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर रवी शास्त्री पुढे काय करणार याची उत्सुकता अऩेकांना आहे. आयपीएल 2022त नव्यानं दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीच्या मुख्य प्रशिक्षकपदी ते विराजमान होतील, अशी चर्चा आहे. त्यावर शास्त्री म्हणाले,'' पुढील वर्षी होणाऱ्या भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीत मी कदाचित कॉमेंट्री करताना दिसेन ( मोठ्यानं हसले).''