Join us  

Ravi Shastri on T20 Cricket: "टी२० क्रिकेटच्या मालिकाच बंद करून टाका"; रवी शास्त्रींचे अजब विधान

असं का म्हणाले रवी शास्त्री, वाचा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 6:08 PM

Open in App

Ravi Shastri, IND vs SA T20 Series: IPL 2022 च्या सीझननंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ९ जूनपासून ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. तर लोकेश राहुलला संघाचा कर्णधार करण्यात आले. या मालिकेच्या निमित्ताने टी२० संघात हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल या खेळाडूंचे पुनरागमन झाले. तसेच IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनाही प्रथमच संघात स्थान मिळाले. पण दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक अजब मत व्यक्त केले.

नुकतेच टी२० फॉरमॅटबद्दल त्यांनी खास विधान केले. आंतरराष्ट्रीय संघांमधील टी२० द्विपक्षीय मालिका बंद करून हा फॉरमॅट केवळ विश्वचषकापुरताच मर्यादित ठेवावा, असं मत रवी शास्त्रींनी व्यक्त केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत ९ जूनपासून पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी रवी शास्त्रींनी हे विधान केले. इएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, "टी२० क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर द्विपक्षीय मालिका खेळवल्या जातात. मी भारतीय संघाचा प्रशिक्षक होतो. मी त्याबद्दलच्या गोष्टी जवळून पाहिल्या आहेत आणि टी२० क्रिकेटबद्दलचं मत मी यापूर्वीही व्यक्त केले होते.

"टी२० क्रिकेट हे फुटबॉलसारखे असावे. याचा फक्त विश्वचषक खेळावा. कारण टी२० द्विपक्षीय मालिका कोणालाच आठवत नाहीत. भारतीय प्रशिक्षक म्हणून मी सांगतो की विश्वचषक वगळता मला एकही टी२० आठवत नाही. एखादा संघ विश्वचषक जिंकतो, ते लोकांना लक्षात राहते. पण इतर सामने मात्र लोकांना फारसे आठवत नाहीत. जगभर फ्रँचायझी क्रिकेट खेळले जात आहे. प्रत्येक देशाला त्यांचे स्वतःचे फ्रेंचायझी क्रिकेट खेळण्याची परवानगी आहे. त्यांचे देशांतर्गत क्रिकेट आहे आणि दर दोन वर्षांनी तुम्ही टी२० विश्वचषक खेळता. त्यामुळे द्विपक्षीय मालिका बंद करून टाका", असं मत शास्त्रींनी मांडले.

टॅग्स :रवी शास्त्रीटी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App