नवी दिल्ली : आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे टी-२० विश्वचषकातील अंतिम सामना पार पडला. इंग्लंडने ५ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला आणि ट्रॉफीवर आपले नाव कोरले. खरं तर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने प्रवेश मिळवला होता. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लिश संघाने भारताचा दारूण पराभव केला. त्यामुळे पुन्हा एकदा भारताला किताबापासून वंचित राहावे लागले.
दरम्यान, आजचा सामना झाल्यानंतर समालोचक आकाश चोप्रासह माजी खेळाडू इरफान पठाण यांनी आगामी विश्वचषकासंबंधी चर्चा केली. या चर्चेत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही सहभाग होता. भारताचा आगामी विश्वचषकासाठी संघ कसा या प्रश्नावर शास्त्रींनी परखड मत व्यक्त केले आहे. भारतीय टी-२० संघाची धुरा एका युवा खेळाडूकडे सोपवायला हवी, यासाठी हार्दिक पांड्या हा पर्याय सर्वोत्तम असल्याचे शास्त्रींनी सांगितले.
संजू सॅमसनला संधी मिळावी - शास्त्री
नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात युजवेंद्र चहलला संधी न दिल्याने शास्त्री चांगलेच संतापले. युवा खेळाडूला का डावलत आहात असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला संधी मिळत नसेल तर त्याचा काय फायदा आहे अशा शब्दांत शास्त्री निवड समितीवर निशाणा साधला आहे. लक्षणीय बाब म्हणजे आगामी विश्वचषकात संजू सॅमसनला जागा मिळावी अशी इच्छा शास्त्री यांनी व्यक्त केली.
२ कर्णधार असावे - इरफान पठाण
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने देखील शास्त्रींच्या सुरात सूर मिसळला आहे. पठाणने म्हटले की, हार्दिक पांड्या हा संघाचा कर्णधार असायला हवा. याशिवाय आणखी एका युवा खेळाडूला कर्णधार म्हणून तयार करण्याची गरज आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Ravi Shastri said that what is the use of not giving a chance to a good performer in IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.