नवी दिल्ली-
भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रुममधील खेळाडूंसोबतचे काही किस्से आणि गोष्टी एका मुलाखतीत कथन केल्या आहेत. गेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री यांचा संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. शास्त्रींनी त्यांच्या कार्यकाळातील खेळाडूंबाबतची काही खास माहिती यावेळी सांगितली. मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या डोळ्यात डोळे घालून आक्रमकपणे खेळणाऱ्या विराट कोहलीच्या पद्धतीवर भाष्य केलं. तसंच ड्रेसिंग रुममध्ये खूप शांत आणि एकांतात राहणं पसंत करणाऱ्या खेळाडूंबाबतही शास्त्रींनी मनमोकळेपणे माहिती दिली आहे. रवी शास्त्रींनी यावेळी रोहित शर्माच्या शांत वृत्तीची तुलना महेंद्रसिंग धोनीसोबत केली. धोनीची शांतवृत्ती जगात सगळ्यात भारी असल्याचंही रवी शास्त्री म्हणाले.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनलवर शास्त्रींनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. "विराट कोहली मैदानात एखाद्या योद्ध्याप्रमाणे उतरतो. मैदानात उतरताच तो प्रतिस्पर्धी संघाला टक्कर देतो. तो इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करत नाही. पण मैदानाबाहेर तो खूप वेगळा असतो. मैदानाबाहेर तो एकदम शांत असतो. मैदानात मात्र तो सर्व बाबतीत आक्रमक असतो. मग ते तो शून्यावर बाद झालेला असला, शतक ठोकलं किंवा मग वर्ल्डकप जिंकला तरी त्याला फरक पडत नाही", असं रवी शास्त्री म्हणाले.
"मी आजवर अनेक खेळाडू पाहिले. पण महेंद्रसिंग धोनीसारखा खेळाडू पाहिला नाही. सचिन देखील शांत असायचा पण काही वेळा त्याचाही पारा चढल्याचं पाहिलं आहे. पण धोनीला मी कधीच संतापलेलं पाहिलेलं नाही. आता या क्षणापर्यंत माझ्याकडे त्याचा फोन नंबर देखील नाही. मी कधी मागितला देखील नाही. मला माहित्येय तो स्वत: जवळ फोन ठेवत नाही", असं रवी शास्त्री म्हणाले.