नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेळापत्रकाच्या समस्येवरून टी-२० सामन्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन केले आहे. टी-२० क्रिकेटच्या वेळापत्रकावरून रंगलेल्या वादामध्ये उडी घेत शास्त्रींनी एक अजब मागणी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २०२३ मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेतील खेळाडू देशात नव्याने सुरू होणाऱ्या देशांतर्गत टी-२० स्पर्धेसाठी उपलब्ध व्हावेत म्हणून ही मालिका रद्द करण्यात आली.
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने तिन्ही प्रकारच्या फॉर्मेटमध्ये खेळण्यास अडचण येत असल्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी स्टोक्सने राजीनामा दिल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. शास्त्री सध्या युनायटेड किंगडमधील स्काय स्पोर्ट्स कॉमेंट्री टीमचे सदस्य आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार द्विदेशीय टी-२० मालिका कमी करून देशांतर्गत लीगकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
टी-२० सामने कमी व्हावेत - शास्त्री वॉनी ॲण्ड टफर्स पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये शास्त्री म्हणाले, "मला वाटतं की द्विदेशीय मालिकेची संख्या कमी करायला हवी, खासकरून टी-२० सामने. फ्रँचायझींद्वारे क्रिकेटला प्रोत्साहन दिले जाऊ शकते, त्यासाठी भारत, वेस्टइंडिज किंवा पाकिस्तान कोणतेही देश असो." भारतीय संघाचे माजी ऑलराउंडर खेळाडू आणि १९८३ मधील विश्वविजेत्या संघाचे सदस्य शास्त्री यांनी भविष्यातील कसोटी क्रिकेटमध्ये दोन विभाग तयार करण्यास सांगितले आहे. दरम्यान शास्त्रींच्या या मागणीने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून त्यांच्या या मागणीने सर्वांनाच आश्चर्य होत आहे.