Ravi Shastri on Gautam Gambhir Team India, IND vs SL: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका आणि त्यानंतर ३ वन डे सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. भारतीय संघ २७ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात करेल आणि आधी टी२० मालिकेला सुरुवात होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळवली संध्याकाळी ७ वाजता पल्लेकल येथील मैदानावर खेळवली जाणार आहे. या मालिकेतून गौतम गंभीर प्रशिक्षकपदाची सुरुवात करणार आहे. याच दरम्यान भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गौतम गंभीरबाबत मोठे विधान केले.
"गौतम गंभीर हा सध्याच्या खेळाडूंचा समकालीन आहे. त्याचा नुकताच IPLचा हंगाम चांगला गेला होता. मला वाटते की तो हेड कोच म्हणून योग्य वयाचा आहे. तो तरुण आहे, त्यामुळे तो नवीन कल्पना घेऊन संघाची मदत करू शकेल. सध्याच्या संघातील बहुतेक खेळाडूंना तो ओळखतो. वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये तो संघाचा भाग होता. त्यामुळे तो नक्कीच नव्या कल्पनांना संधी देईल. गौतम गंभीर हा अतिशय रोखठोक बोलणारा व्यक्ती आहे आणि त्याला एक चांगला परिपक्व असा संघही मिळाला आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन नक्कीच चांगली कामगिरी करेल," असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.
"मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कामाबाबत परिपक्व असाल तरी काही लोकांकडून मिळालेल्या नव्या कल्पनांमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे गौतम गंभीरच्या काळात भारतीय संघ कसा घडतो, हे पाहणं खरंच रंजक असेल. कोचच्या दृष्टीने प्रत्येक खेळाडूवर लक्ष असणे आणि प्रत्येकाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे हा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे गंभीर कोणत्या अप्रोचने खेळाडूंशी नातं तयार करतो हे पाहावं लागेल. माझं वैयक्तिक मत विचाराल तर गंभीरकडे सध्या साधने आहेत, अनुभव आहे आणि काम करण्याची इच्छा आहे. याचा त्याला आणि संघाला नक्कीच फायदा होईल," असेही रवी शास्त्री म्हणाले.