नवी दिल्ली : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते कोविड-१९ मुळे सर्व जग थांबल्यासारखे असल्यामुळे भारतीय संघाला मिळालेली विश्रांती स्वागत योग्य आहे. भारतीय संघाने गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या विश्वकप स्पर्धेनंतर केवळ १०-११ दिवस घरी घालविले आहेत. कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित झालेल्या आहेत.
शास्त्री म्हणाले,‘हा ब्रेक वाईट नाही, कारण न्यूझीलंड दौऱ्याच्या शेवटी थकवा जाणवत होता. विशेषत: शारीरिक व मानसिक थकवा आणि दुखापती. शास्त्री हे एका चर्चासत्रात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल आर्थटन, नासिर हुसेन व रॉब की यांच्यासोबत चर्चा करीत होते.
शास्त्री म्हणाले, खेळाडू या वेळेचा उपयोग ताजेतवाणे होण्यासाठी करू शकतात.
गेल्या १० महिन्यात आम्ही बरेच क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे थकवा दिसत होता. मी आणि सपोर्ट स्टाफचे काही सदस्य इंग्लंडमध्ये विश्वकपसाठी २३ मे रोजी गेले होतो आणि आतापर्यंत त्यांना १० किंवा ११ दिवस घरी थांबता आले. काही खेळाडू तीन प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत आहेत. त्यामुळे ते किती थकले असतील याची तुम्हाला कल्पना आली असेलच. कसोटीतून टी-२० क्रिकेटमध्ये शिफ्ट होणे आणि एवढा प्रवास करणे सोपे नाही.’
विश्वकप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये गेला आणि त्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्यानंतर न्यूझीलंडचा दौरा केला. भारतात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे आणि शास्त्री यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द झाल्यानंतर आमच्या खेळाडूंनी असे काही घडेल, अशी शक्यता वर्तवली होती.
शास्त्री म्हणाले, ‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान प्रवासात असल्यामुळे आम्हाला असे वाटले होते की असे काही होण्याची शक्यता आहे. आजार त्यावेळी पसरण्यास सुरुवात झाली होती. दुसरा वन-डे सामना रद्द झाल्यानंतर आम्हाला कल्पना आली होती की लॉकडाऊन आवश्यक आहे. नशिबाने न्यूझीलंडहून परतण्याची वेळ योग्य होती. त्यावेळी तेथे दोनच रुग्ण होते, पण आता ३०० आहेत. विमानतळावर स्क्रिनिंग व तपासणीचा तो पहिला दिवस होता.’
शास्त्री पुढे म्हणाले, ‘अशावेळी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. अशावेळी डोक्यात क्रिकेट नकोच. विराटने संदेश दिला आहे आणि अन्य खेळाडूही देत आहेत. परिस्थिती गंभीर असून आता क्रिकेट आवश्यक नाही.’
‘कोहली’ भारतीय क्रिकेटचा बॉस
विराट कोहली भारतीय क्रिकेटचा बॉस असल्याचे सांगत सपोर्ट स्टाफ कर्णधारावरील दडपण कमी करण्यासाठी आहे, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
शास्त्री म्हणाले, ‘कर्णधारच बॉस आहे, असे माझे मत आहे. कोचिंग स्टाफचे काम खेळाडूंना सकारात्मक व बेदरकारपणे खेळण्यासाठी सज्ज करण्याचे असते. कर्णधार संघाचे नेतृत्व करतो. आम्ही त्याचे दडपण कमी करतो. पण मैदानावर त्यालाच जबाबदारी सांभाळावी लागते. तो लय कायम राखण्यासाठी मदत करतो.’ तीन वर्षांपूर्वी भारताचे प्रशिक्षकपद स्वीकारणाºया शास्त्री यांनी आयसीसी कसोटी मानांकनामध्ये भारताला अव्वल स्थानी पोहचविण्याचे श्रेय कोहलीला दिले आहे.
शास्त्री म्हणाले, ‘फिटनेसबाबत चर्चा करताना नेतृत्व सर्वप्रथम असते आणि त्या स्थानी विराट आहे. त्याच्या मते जर त्याला खेळायचे असेल तर जगातील सर्वात फिट खेळाडू व्हावे लागेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. तो फिटनेसवर बरीच मेहनत घेतो. केवळ सरावच नाही तर खाण्याच्या बाबतीतही तो बराच त्याग करतो. एक दिवस माझ्याकडे आला आणि मला सांगितले की तो शाकाहारी झाला आहे. आता तो असे निकष तयार करतो की दुसऱ्यांना त्यापासून प्रेरणा मिळते.’
Web Title: Ravi Shastri says Lockdown gives Indian players rest; will be used to be fresh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.