IPL 2023 । जयपूर : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने यजमान राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. राजस्थानने हातचा सामना गमावल्यानंतर संघाचा युवा खेळाडू रियान परागवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. रियानने अद्याप चालू हंगामात एकही मोठी खेळी केली नाही. जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात त्याने लखनौविरूद्ध धिम्या गतीने धावा केल्याने त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. यावरूनच आता भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी युवा खेळाडूवर टीकास्त्र सोडले आहे.
दरम्यान, रियान परागच्या धिम्या खेळीमुळेच राजस्थान रॉयल्सला पराभव स्वीकारावा लागला असल्याचे शास्त्री यांनी म्हटले आहे. परागने कालच्या सामन्यात १२ चेंडूत १५ धावांची नाबाद खेळी केली. त्याला केवळ १ चौकार आणि १ षटकार मारण्यात यश आले. मात्र, संघाच्या पराभवाला त्याला जबाबदार धरले जात आहे.
"रियानने पहिल्या ८ चेंडूत जास्त धावा केल्या नाहीत"सामन्यानंतर शास्त्री यांनी राजस्थान रॉयल्सच्या पराभवाला रियान पराग जबाबदार असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले, "राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना गमावले होते. तरीदेखील त्यांच्याकडे पर्यायी फलंदाज होते. मला वाटते की, रियान परागने ज्या प्रकारे सुरूवातीचे ८ चेंडू खेळले त्यामुळे सामन्याचा निकाल बदलला. दुसरीकडे देवदत्त पडिकल देखील लयमध्ये दिसत नव्हता."
लखनौचा १० धावांनी विजय रियान पराग सोळाव्या षटकात फलंदाजीसाठी आला. त्यावेळी संघाला विजयासाठी ५१ धावांची आवश्यकता होती. रियान पराग सामना राजस्थानच्या नावावर करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण त्याने १२ चेंडूत केवळ १५ धावा केल्या. म्हणजेच रियानने १० चेंडूत फक्त ५ धावा केल्या. अखेर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने १० धावांनी सामना आपल्या नावावर केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"