कोलकाता : भारत आणि बांगलादेश यांच्यामधील पहिल्या डे नाइट सामन्याला काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. या सामन्याबद्दल भारतीय खेळाडूंच्या मनात नेमके आहे तरी काय, हे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले आहे.
रवी शास्त्री म्हणाले की, " हा भारतीय संघासाठी ऐतिहासिक क्षण आहे. कारण यापूर्वी भारतीय संघ असा सामना कधीच खेळलेला नाही. त्यामुळे भारतीय संघामध्ये या सामन्याबाबत उत्सुकता आहे. पहिल्या ऐतिहासिक सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे."
भारतामध्ये पहिल्यांदाच डे नाइट कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात गुलाबी चेंडूं वापरण्यात येणार आहे. पण या गुलाबी चेंडूने फिल्डिंग करणे आव्हानात्मक असेल,असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.याबाबत विराट म्हणाला की, " गुलाबी चेंडू हा थोडा जड आहे. हॉकीच्या चेंडूसारखा तो मला भासला. त्यामुळे गुलाबी चेंडूने फिल्डिंग करणे सोपे नसेल. कारण चेंडू जोरात आला तर तुम्हाला दुखापत होऊ शकते. त्यामुळे गुलाबी चेंडूने फिल्डिंग करणे आव्हानात्मक असेल."
भारतामध्ये पहिल्यांदाच डे नाइट टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. पण यापूर्वीही भारताची एक डे नाइट टेस्ट मॅच होणार होती. पण या मॅचचे नेमके काय झाले, याबाबत कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.भारताचा संघ गेल्यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा भारताचा संघ कसोटी मालिकाही खेळणार होता. या कसोटी मालिकेत भारताने एक सामना डे नाइट खेळावा, अशी ऑस्ट्रेलियाने विनंती केली होती. पण भारताने ही विनंती मान्य केली नाही. भारताने डे नाइट टेस्ट खेळायला तेव्हा का नकार दिला, याबाबत कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे.या बाबत कोहली म्हणाला की, " डे नाइट कसोटी खेळणे सोपे नसते. या सामन्यांमध्ये गुलाबी चेंडू वापरला जातो. या चेंडूचा तुम्हाला चांगला सराव असेल तरच तुम्ही डे नाइट टेस्ट खेळू शकता. ही गोष्ट पटकन स्वीकारण्यासारखी नक्कीच नाही. जर ही गोष्ट फार पूर्वी ठरली असती तर आम्ही विनंती स्वीकारून डे नाइट टेस्ट मॅच खेळलो असतो. पण ऐनवेळी या गोष्टी ठरवून होणार नाही."