Ravi Shastri vs Virat Kohli: टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि विराट कोहली जोडीने एकत्रितपणे भारतीय संघाला अनेक सामने आणि मालिका जिंकवून दिल्या. रवी शास्त्रींनी टी२० विश्वचषक २०२१ संपल्यानंतर पदत्याग केला. त्यानंतर ते सातत्याने विविध वाहिन्यांना मुलाखती देताना दिसत आहेत. अशाच एका मुलाखतीत दरम्यान त्यांनी विराट कोहलीबद्दलचा एक किस्सा सांगितला. शास्त्रींना एका अनुभवी खेळाडू संघात हवा होता, पण विराट कोहलीने मात्र त्या खेळाडूला संघात घेण्यास साफ नकार दिला, असा किस्सा शास्त्रींनी सांगितला.
रवी शास्त्री म्हणाले की २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर एका कसोटी मालिकेसाठी त्यांनी शिखर धवनला संघात स्थान देण्याबाबत आग्रह धरला होता त्यावेळी विराटने मात्र त्याला नकार दिला होता. एका टीव्ही शो मध्ये मुलाखतीदरम्यान बोलताना शास्त्री म्हणाले की मुरली विजयची त्यावेळी शस्त्रक्रिया झाली होती. अशा वेळी तो पूर्णपणे सावरेपर्यंत शिखर धवनला संघात स्थान द्यावे असं माझं मत होतं. पण विराटने त्यावेळी नकार दिला.
रवी शास्त्री पुढे म्हणाले की, शिखर धवनने चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करून दाखवली होती. तो चांगल्या लयीत होता, त्यामुळे मला त्याला संघात घ्यायचं होतं. मी विराटला सांगितलं देखील होतं की त्याने चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे त्याला संघात घ्यायला हवं पण विराटने मात्र सरळ मला नकार दिला.
विराटने त्यावेळी रवी शास्त्रींना सांगितले होते की आपण संघात एका वेगळ्या खेळाडूला संधी देण्याचा विचार करतो होतो त्यामुळे आपण त्याच योजनेनुसार विचार करू. पण अखेर रवी शास्त्रींनी थोडा जोर दिल्यावर शिखर धवनला संघात घेण्यात आले. त्याला संघात घेतल्यावर त्याने श्रीलंकेविरूद्ध १९० धावांची दणकेबाज खेळी केली आणि संघाला विजयही मिळवून दिला होता, अशीही आठवण शास्त्रींनी सांगितली.