शास्त्री-कोहली यांची शानदार जुगलबंदी

. साखळी फेरीत सर्वोत्तम संघ ठरताना भारताने अव्वल स्थानी कब्जा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 10:16 AM2021-11-11T10:16:00+5:302021-11-11T10:20:06+5:30

whatsapp join usJoin us
Ravi Shastri Virat Kohli's brilliant juggling | शास्त्री-कोहली यांची शानदार जुगलबंदी

शास्त्री-कोहली यांची शानदार जुगलबंदी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्याआधी, विराट कोहलीने स्पर्धेनंतर आपण टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. शास्त्री यांच्या पदाची जबाबदारी घेण्यास भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून प्रसिद्ध असलेले राहुल द्रविड सज्ज झाले असून भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्माकडे आली आहे.

शास्त्री-कोहली यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटने गाठलेली उंची शानदार होती. शास्त्री-कोहली ही प्रशिक्षक-कर्णधाराची जोडी क्रिकेटविश्वात सुपरहीट ठरली. यानिमित्ताने भारताच्या या देदिप्यमान कामगिरीवर टाकलेली ही एक नजर.याव्यतिरिक्त शास्त्री-कोहली यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या ‘सेना’ देशांमध्ये (एसईएनए) टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. २०१७ साली भारताने श्रीलंकेला ३-० असा क्लीन स्वीप दिला. तसेच पहिल्यांदाच वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकताना विंडीजला व्हाईटवॉश दिला.

इंग्लंडमध्ये राखले वर्चस्व :

शास्त्री आणि कोहली यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने यंदा इंग्लंड दौरा अक्षरश: गाजवला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी ऐतिहासिक आघाडी घेत भारताने आपली ताकद दाखवली.

कसोटी अजिंक्यपद उपविजेतेपद :

यावर्षी झालेल्या पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची अंतिम फेरी गाठत टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे आव्हान मोडले. मात्र, अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ८ गड्यांनी पराभव पत्करावा लागल्याने भारताला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

विश्वचषक उपांत्य फेरी 

इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी २०१९ विश्वचषक स्पर्धेत शास्त्री-कोहली यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने अपराजित राहण्याची कामगिरी करत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. साखळी फेरीत सर्वोत्तम संघ ठरताना भारताने अव्वल स्थानी कब्जा केला. परंतु, उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने भारताला स्पर्धेबाहेर जावे लागले.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर कब्जा :

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवणे, हे प्रत्येक संघासाठी दिव्यच असते. परंतु, हे दिव्य एकदा नव्हे, तर सलग दोनवेळा पार करण्यात भारतीय संघाला यश मिळाले. शास्त्री-कोहली यांच्या मार्गदर्शनात टीम इंडियाने २०१८-१९ मध्ये सर्वप्रथम बाजी मारली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत पहिला आशियाई देश ठरला. 

यानंतर २०२०-२१ सत्रात पुन्हा भारताने कांगारुंना त्यांच्याच देशात धूळ चारली. यावेळी पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर कोहलीने माघार घेतली. मात्र शास्त्री यांचे मार्गदर्शन आणि अजिंक्य रहाणेचे शांत नेतृत्व या जोरावर भारताने सलग दुसऱ्यांदा कांगारुंची शिकार करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर कब्जा केला.

 

Web Title: Ravi Shastri Virat Kohli's brilliant juggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.