मुंबई : भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक कोण असेल? रवी शास्त्रींनाच पुन्हा संधी मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तर सध्या क्रिकेट चाहते शोधत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) नुकतेच मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 30 जुलैपर्यंत या पदासाठी अर्ज करायचे आहे. त्यासाठी रवी शास्त्रीही अर्ज करू शकतात, परंतु बीसीसीआयनं घातलेल्या अटींची पूर्तता शास्त्रींकडून होत नाही. त्यामुळे त्यांनी अर्ज केला तरी ते अपात्र ठरतील, कसे ते जाणून घेऊया...
प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ठेवल्या 'या' तीन अटी
- मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या संघाला दोन ते तीन वर्ष प्रशिक्षण देण्याचा अनुभव असावा. शिवाय त्याने 30 कसोटी किंवा 50 वन डे सामने खेळलेले असावेत
- फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान 10 कसोटी किंवा 25 वन डे सामने खेळलेले असावेत
- त्यांचे वय 60 वर्षांहून कमी असावेत
यातील प्रशिक्षणाच्या अनुभवाचा नियम पाहिल्यास रवी शास्त्री अपात्र ठरतील. 2014मध्ये ते भारतीय संघाचे संचालक म्हणून कार्यरत होते. शास्त्री यांनी 1982 ते 1992 पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. निवृत्तीनंतर ते विविध क्रिकेट प्रसारण करणाऱ्या कंपनींसोबत काम करत आहेत आणि 2007 साली बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेचा अनुभव वगळता त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा फारसा अनुभव नाही.
2014च्या इंग्लंड दौऱ्यात शास्त्रींची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. तेव्हा डंकन फ्लेचर हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि 2015 च्या वर्ल्ड कपनंतर त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर जून 2016पर्यंत शास्त्री हे संचालक म्हणूनच संघासोत होते. अनिल कुबंळे यांना प्रशिक्षकपदावरून काढून टाकल्यानंतर 2017मध्ये शास्त्रींकडे मुख्य प्रशिक्षकपद आले. त्यामुळे प्रशिक्षकाच्या अनुभवाच्या नियमानुसार शास्त्री अपात्र ठरताना पाहायला मिळत आहेत.