Join us

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रवी शास्त्री यांचे मोठं वक्तव्य; जसप्रीत बुमराह नसेल तर...

भारतीय संघाने घाई गडबडीने त्याला ताफ्यात सामील करू नये, असा सल्लाही शास्त्रींनी दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 18:28 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी जसप्रीत बुमराहच्या फिटनेसमुळे टीम इंडिया चिंतेत आहे. तो या स्पर्धेत खेळणार की नाही, ते पूर्णत: त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय  संघात कोण योग्य पर्याय ठरू शकेल, अशी चर्चा रंगत असताना बुमराहचा फिटनेस अन् त्याच्या कमबॅकसंदर्भात भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केले आहे.  जर जसप्रीत बुमराह संघात नसेल तर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कमकूवत होईल, असे मत रवी शास्त्री यांनी मांडले आहे. एवढेच नाही तर शंभर टक्के फिट असल्याशिवाय भारतीय संघाने घाई गडबडीने त्याला ताफ्यात सामील करू नये, असा सल्लाही शास्त्रींनी दिला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या निरीक्षणाखाली आहे बुमराह

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह  पाठीच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकला नव्हता. तो फिटनेस चाचणी देऊन पुन्हा कमबॅकसाठी प्रयत्नशील आहे. सध्या जसप्रीत बुमराह बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येणाऱ्या वैद्यकीय अहवालानंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी फिट आहे किंवा नाही ते ठरणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून तो बाहेर पडल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही तो मुकू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियासाठी आयसीसीची स्पर्धा जिंकण कठीण होईल, असे शास्त्रांना वाटते.  

बुमराहची उणीव भारतीय संघाच्या विजयाच्या गॅरेंटी कमी करणारी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या रिव्यू शोमध्ये रवी शास्त्री यांनी जसप्रीत बुमराहसंदर्भातील मुद्यावर भाष्य केले. यावेळी शास्त्री म्हणाले की, बुमराह फिट नसेल तर भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे शक्यता ३० ते ३५ टक्क्यांनी कमी होईल. बुमराह शंभर टक्के फिट असतो त्यावेळी डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या गोलंदाजीची गॅरेंटी असते,असा उल्लेखही शास्त्रींनी केला आहे.

मला वाटतं ती जोखीम घेऊ नये

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ३२ विकेट्स घेत अनेक विक्रमांना गवसणी घातली होती. या गोलंदाजाच्या कमबॅकसाठी गडबड करू नये, असा सल्लाही शास्त्रींनी बीसीसीआय निवडकर्त्यांना दिला आहे. बुमराहच्या कमबॅकसंदर्भात शास्त्री म्हणाले आहेत की, बुमराहच्या कमबॅकसाठी गडबड करणं योग्य नाही. ती मोठी जोखीम ठरेल. पुढे भारतीय संघाला खूप क्रिकेट खेळायचं आहे. अचानक संघात घेत त्याला गोलंदाजी करायला लावणं आणि त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. कमबॅक करणं सोपी गोष्ट नाही, या मुद्यावरही त्यांनी जोर दिला आहे.

 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफीजसप्रित बुमराहरवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघ