ललित झांबरे, इंदूर : क्रिकेट जगतात शेकडो विकेट घेणारे भले भले गोलंदाज होऊन गेलेत पण आजपर्यंत जगभरात कुणालाही न जमलेला विक्रम मध्यप्रदेशचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी यादव याने आपल्या पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात केला आहे. उत्तर प्रदेशविरुध्दच्या रणजी सामन्यात आपल्या पाहिल्याच षटकात त्याने हॅटट्रीक घेतली आणि क्रिकेटच्या इतिहासात प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणातील पहिल्याच षटकात हॅटट्रीक नोंदवणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला.
होळकर स्टेडीयमवरच्या या सामन्यात रवीने सोमवारी एकच षटक टाकले. उत्तर प्रदेशच्या डावातील ते सातवे षटक होते. त्यातील तिसºया चेंडूवर त्याने आर्यन जुयाल याला यष्टीरक्षकाकडून झेलबाद केले. पुढल्या चेंडूवर उत्तर प्रदेशचा कर्णधार अंकित राजपूत हा त्याचा बळी ठरला आणि षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने समीर रिझवी याला परतीची वाट दाखवली. अंकित व समीर या दोघांना त्याने त्रिफळाबाद केले.
रवीेचे वय 28 वर्षाच्या वर असले तरी त्याने अद्याप एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नव्हता. मात्र गोलंदाजीतील पहिला बदल म्हणून संधी मिळाल्यावर त्याने हा इतिहास घडवला. त्यामुळे मध्यप्रदेशच्या 230 धावांच्या उत्तरात उत्तर प्रदेशची स्थिती 3 बाद 22 अशी झाली आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच हॅटट्रीक घेणारे रवी यादवच्या आधी 17 गोलंदाज आहेत परंतु त्यापैकी कुणालाही आपल्या पहिल्याच षटकात हॅटट्रीक घेता आलेली नव्हती. याबाबत दक्षिण आफ्रिकेतील बोर्डर संघाचा आर.आर.फिलीप्स हा रवी यादवच्या जवळपास आहे कारण फिलीप्सनेही प्रथम श्रेणीे क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच षटकात हॅटट्रीक घेतली होती पण फरक हा की तो त्याचा पहिला नाही तर पाचवा सामना होता. आधीच्या चार सामन्यांमध्ये त्याला गोलंदाजीची संधीच मिळाली नव्हती.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच हॅट्ट्रीक
एच.हे (साऊथ आॅस्ट्रेलिया)- 1902-03एच.ए.सेजविक (यॉर्कशायर)- 1906डब्ल्यू.ई.बेनस्कीन (लिसेस्टरशायर)- 1906आर. वूस्टर (नॉर्दम्पटनशायर)- 1925जे.सी.ट्रीनॉर (न्यू साऊथ वेल्स)- 1954-55वसंत रांजणे (महाराष्ट्र)- 1956-57अर्शद खान (ढाका विद्यापीठ)- 1957-58एन.फ्रेडरिक (सिलोन)- 1963-64जे.एस.राव (सेनादल)- 1963-64महेबुदल्लाह (उत्तर प्रदेश) -1971-72आर.ओ.इस्टविक (बार्बेडोस)- 1982-83सलील अंकोला (महाराष्टÑ)- 1988-89जवागल श्रीनाथ (कर्नाटक) - 1989-90एस.पी.मुखर्जी (बंगाल)-1989-90एस.एम.हारवूड (व्हिक्टोरिया)- 2002-03पी.कॉनेल (आयर्लंड)- 2008अभिमन्यू मिथून (उत्तर प्रदेश)- 2009-10रवी यादव (मध्यप्रदेश)- 2020