भारतीय संघातील स्टार अष्टपैल रविचंद्रन अश्विन यानं कानपूर कसोटी सामन्यात नवा इतिहास रचला आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या प्रत्येक हंगामात ५० फलंदाजांना तंबूत धाडण्याचा भीम पराक्रम त्याने करून दाखवला आहे. एवढेच नाही तर सर्वाधिक वेळा मालिकावीरसह दिग्गज फिरकीपटू मुरलीधन याची त्याने बरोबरी केलीये.
शाकिबची विकेट अन् अश्विनचा युनिक रेकॉर्ड
ICC च्या कसोटी क्रमवारीतील नंबर वन असलेल्या ३८ वर्षीय अश्विननं बागंलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटीत दुसरी विकेट घेताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रत्येक हंगामात ५० विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावे झाला. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत अन्य कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. बांगलादेशच्या पहिल्या डावात शाकिब अल हसनची विकेट घेताच त्याने या खास विक्रमाला गवसणी घातली.
WTC च्या तिन्ही हंगामात ५० विकेट्सचा टप्पा गाठण्याचा खास विक्रम
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. २०१९-२१ च्या पहिल्या वहिल्या हंगामात त्याने १४ सामन्यात ७१ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर २०२०-२१ च्या गत हंगामात अश्विनने १३ सामन्यात ६१ बळी टिपले होते. यंदाच्या हंगामात १० सामन्यात त्याच्या खात्यात ५३ विकेट्सची नोंद आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या एका हंगामात ५० विकेट्स घेणाऱ्या अन्य गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन आणि पॅट कमिन्ससह न्यूझीलंडच्या टीम साउदीचा समावेश आहे. पण या खेळाडूंनी २ हंगामातच अशी कामगिरी केली आहे.
मुरलीधरनची बरोबरी
कानपूर कसोटीतील विजयानंतर आर अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कसोटी कारकिर्दीत त्याने ११ व्या वेळी हा पुरस्कार पटकवला. यासह त्याने कसोटीत सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
कसोटीत सर्वाधिक वेळा मालिकावीर ठरलेले खेळाडू
- ११ वेळा - मुथय्या मुरलीधन
- ११ वेळा - आर अश्विन
- ९ वेळा -जॅक कॅलिस
- ८ वेळा -सर रिचर्ड हेडली
- ८ वेळा -इम्रान खान
- ८ वेळा- शेन वॉर्न