भारतीय संघातील अनुभवी फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याला ट्वेंटी-२० संघात चार वर्षांनंतर संघात स्थान मिळाले. इंग्लंड दौऱ्यावर चारही कसोटी सामन्यांत बाकावर बसून रहावे लागलेल्या अश्विनची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री सर्वांना आश्चर्याचा धक्का होता. २०१७नंतर तो टीम इंडियाकडून ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे. आता भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) आहे. आर अश्विन हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी येणाऱ्या वर्षात महत्वाचा खेळाडू असेल असे विधान रोहित शर्मानं व्यक्त केलं. अश्विन हा कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे, परंतु मर्यादित षटकाच्या संघात मागील काही वर्षांपासून त्यानं स्थान गमावले आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आर अश्विननं जबरदस्त कमबॅक केले. अश्विनच्या कामगिरीवर रोहित प्रभावित आहे आणि त्याचं त्यानं कौतुक केलं आहे. तो म्हणाला,''आर अश्विनमुळे तुम्हाला एक फ्लेक्झिबिलिटी मिळते, तुम्ही त्याला पॉवर प्लेमध्येही वापरू शकता किंवा मधल्या षटकांत. त्याच्यासारखा गोलंदाज खरं म्हणायचं तर अष्टपैलू खेळाडू संघात असणे गरजेचं आहे. तो कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करू शकतो, ते खूप महत्त्वाचे आहे.''
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि फ्रँचायझी लीगमध्ये आर अश्विन पॉवरप्ले व डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. रोहितच्या मते त्याचे भारतीय संघात असणे महत्त्वाचे आहे. ''एकाच स्वरूपाची किंवा एकसारख्या परिस्थितीत गोलंदाजी करणारा खेळाडू तुम्हाला नको असणार. फक्त पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणारा, डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी न करणारा, राईट हँडर फलंदाजाला किंवा लेफ्ट हँडर फलंदाजाला गोलंदाजी करणारा, असा एकाच तराजून मोजता येणारा गोलंदाज नसावा. गोलंदाजाकडून तुम्हाला अधिक पर्याय मिळणे, हे संघासाठी महत्वाचे असले. अश्विन तसा गोलंदाज आहे आणि तो संघात कायम राहण्यासाठी आलाय. तो नक्कीच कायम राहील,''असेही रोहित म्हणाला.
दरम्यान, आर अश्विननं आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पॅट कमिन्स अन् त्याच्यातील गुणांचे अंतर कमी केले आहे.