मुंबई: भारतीय संघाचा फिरकीपटू व आयपीएलमधीलकिंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन आश्विन 2020च्या आयपीएलच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार असल्याचे समोर आले आहे. या संर्दभातील दुजोरा किंग्ज इलेव्हन संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी दिला आहे.
नेस वाडिया म्हणाले की, किंग्ज इलेव्हन पंजाबने अश्विनला रिलीज करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला संघात विकत घेण्यासाठी रुची दाखवली होती. तसेच इतर संघानेही अश्विनला आपल्या संघात घेण्याबाबत रस दाखवला असे त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून किंग्ज इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये देवाण- घेवाण करारावर चर्चा सुरु होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे नेस वाडिया यांनी सांगितले.
किंग्ज इलेव्हन पंजाबचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी अश्विन 2020च्या मोसमात पंजाब संघाचे नेतृत्व करणार की नाही याची खात्री नसल्याचे सांगितले होते. आश्विनला दिल्ली संघाकडे देण्यात कुंबळे तयार नसल्यामुळे हा करार काहीकाळ थांबवण्यात आला होता. मात्र पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी बुधवारी आश्विनला पंजाब संघाने रिलिज केले असल्याचे स्पष्ट केले.
अश्विनच्या जाण्याने आगामी मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधारपद भारतीय संघाचा सलामी फलंदाज केएल राहुलकडे दिले जाऊ शकते. केएल राहुल गेले दोन हंगाम पंजाब संघासोबत आहे. गेल्या हंगामात केएल राहुलने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे पंजाब संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे सोपविण्यात येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.