२०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आर अश्विननं निवृत्तीचा विचार सुरू केल्याचं विधान केलं आहे. या दौऱ्यावरील मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shatri) यांच्या एका विधानानं आपलं खच्चिकरण केल्याचा दावा भारताचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विननं ( R Ashwin) केला आहे. कपिल देव यांचा कसोटी क्रिकेटमधील ४३४ विकेट्सचा विक्रम तोडण्यासाठी अश्विनला केवळ ८ बळी टिपायचे आहेत आमि तो भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनेल. असे असतानाही २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एका प्रसंगानं मनात नैराश्य पसरल्याचं अश्विननं मान्य केलं. त्या दौऱ्यातील अखेरचा सामना सिडनीत खेळवला गेला आणि त्यात कुलदीप यादवनं पाच विकेट्स घेत यजमानांना बॅकफूटवर फेकले होते. त्यानंतर रवी शास्त्री यांनी ते विधान केलं.
''कुलदीप यादव परदेशात कसोटी क्रिकेट खेळलाय आणि त्यानं आज पाच विकेट्स घेतला. तो आता परदेशात भारताचा प्रमुख फिरकीपटू बनला आहे. पुढेही जेव्हा आम्हाला एकाच फिरकीपटूसह मैदानात उतरावे लागले, तर तोच आमची पहिली निवड असेल. कदाचित इतरांना संधी मिळू शकते ( अश्विनचं नाव न घेता), परंतु आता कुलदीप हाच परदेशात टीम इंडियाचा नंबर वन कसोटी फिरकीपटू आहे,''असे शास्त्री म्हणाले होते.
त्याबाबात अश्विननं ESPNcricinfoला दिलेल्या मुलाखतीत त्याचं मत मांडलं, ''कुलदीप यादवसाठी मी आनंदी होतो, परंतु शास्त्रींच्या त्या विधानानं माझं खच्चीकरण केलं आणि मला असं वाटलं की मला बसखाली फेकले आहे.'' तो पुढे म्हणाला,''मी रवी भाईचा आदर करतो, आम्ही सर्वच करतो. आपण काही गोष्टी बोलतो आणि त्या मागेही घेतो, हे मी समजू शकतो. पण, त्याक्षणी मी खचलो. सहकाऱ्याच्या यशाचा आनंद साजरा करणेही महत्त्वाचे आहे आणि मी कुलदीपसाठी आनंदी होतो. मला ऑस्ट्रेलियात पाच विकेट्स घेता आल्या नाहीत, परंतु त्यानं ते केलं. हे खूप मोठं यश आहे. चांगली गोलंदाजी करूनही मला पाच विकेट्स घेता आल्या नाहीत. त्यामुळे मी खरंच कुलदीपसाठी आनंदी होतो.''
''पण, त्यांच्या विधानानंतर मला बसखाली फेकलंय असं वाटले आणि मनात अशी कालवाकालव सुरू असताना सहकाऱ्याच्या आनंदात मी कसा सहभागी होऊ? मी रूममध्ये परतलो आणि पत्नीशी याविषयी बोललो. माझी मुलंही तिथे होती. त्यानंतरही मी पार्टीत सहभागी झालो, कारण सरतेशेवटी आम्ही मोठा मालिका विजय मिळवला होता,''असेही तो म्हणाला.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत आर अश्विननं सहा विकेट्स घेतल्या होत्या आणि भारतानं ३१ धावांनी मिळवलेल्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पण, दुखापतीमुले पुढील तीन सामन्यांत त्याला खेळता आले नाही. मालिकेनंतर अश्विनची पहिल्या कसोटीतील कामगिरी सर्व विसरले होते. कारण तेव्हा चर्चा आणि तुलना सुरू झाली होती. चार सामन्यांची मालिका भारतानं २-१ अशी जिंकली होती. त्यात अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यांनी अनुक्रमे ६, ७ व ५ विकेट्स घेतल्या होत्या.