'कौन बनेगा करोडपती' या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. शोचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे देखील 'कौन बनेगा करोडपती'ने प्रेक्षकांच्या मनात जागा केली. सामान्य लोकांना प्रसिद्धी आणि असामान्य जागी घेऊन जाणारं हे व्यासपीठ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अलीकडेच एका एपिसोडदरम्यान शोमध्ये क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचं उत्तर दिल्यास २५ लाख रूपये मिळणार होते.
दरम्यान, प्रश्न असा होता की, कसोटी क्रिकेटमध्ये वडील आणि मुलगा दोघांनाही बाद करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण?. या प्रश्नासाठी नेहमीप्रमाणे चार पर्याय देण्यात आले होते. यामध्ये रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांची नावं होती.
या प्रश्नाचं उत्तर अलीकडेच झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यात लपलं आहे. खरं तर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत असताना हा योगायोग घडला. लक्षणीय बाब म्हणजे भारताचा स्टार फिरकीपटू अश्विननं तेजनारायण चंद्रपॉलला बाद करून ही किमया साधली. यापूर्वी त्यानं तेजनारायणचं वडील शिवनारायण चंद्रपॉल यांनाही बाद केले होते.
काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात अश्विननं चंद्रपॉलला अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत करून १२ धावांवर माघारी पाठवले. २०११ मध्ये अश्विनने शिवनारायण चंद्रपॉलची विकेट घेतली होती आणि या सामन्यात त्याच्या मुलालाही त्यानं बाद केलं. बाप-मुलाला बाद करणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला.