ICC Test Rankings - भारताचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याने जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत नंबर १ स्थान पटकावले आहे. त्याने सहकारी जसप्रीत बुमराह याला मागे टाकून हा अव्वल क्रमांकाचा ताज पटकावला. धर्मशाला येथे कारकीर्दितील १००वी कसोटी खेळणाऱ्या अश्विनने इंग्लंडचे धाबे दणाणून सोडले होते. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
या कामगिरीचा फायदा त्याला आयसीसी कसोटी गोलंदांच्या क्रमवारीत झाला. त्याने ८७० रेटींग गुणासह अव्वल स्थान काबीज केले आणि जसप्रीत ८४७ रेटींग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ( ८४७) दोन स्थान वर सरकला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेतल्या होत्या. भारताचा कुलदीप यादव यानेही १५ स्थानांची झेप घेताना कारकीर्दीतील सर्वोत्तम १६ वे क्रमांक पटकावले. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या आणि तो सामनावीर ठरला होता.
कसोटी फलंदाजांची क्रमवारी...
धर्मशाला कसोटीच्या निकालानंतर भारताच्या फलंदाजांनीही आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. या कसोटीत रोहित शर्मा ( १०३), शुबमन गिल ( ११०) व यशस्वी जैस्वाल ( ५७) यांनी चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे रोहित पाच स्थानांच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर आला आहे आणि अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या केन विलियम्सन व त्याच्यात केवळ १०८ रेटींग गुणांचे अंतर राहिले आहे. जैस्वाल २ स्थानांच्या सुधारणेसह आठव्या आणि गिल ११ स्थानांच्या सुधारणेसह २०व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सातत्याने अपयशी ठरतोय आणि तो पाचव्या क्रमांकावर घसरला आहे, तर पाकिस्तानचा बाबर आजम तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराट कोहलीची ९व्या क्रमांकावर आणि रिषभ पंतची १५व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.