भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर.अश्विन (R Ashwin) भारताच्या कसोटी संघाचा फिरकीपटू म्हणून ओळखला जात होता. कारण वनडे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी आर.अश्विनची निवड केली जात नव्हती. पण २०२१ हे वर्ष आर.अश्विनसाठी खूप खास ठरलं आहे. ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी अश्विनची भारतीय संघात निवड झाली आणि आता द.आफ्रिकेविरुद्धच्या वनडे संघातही अश्विनचं पुनरागमन झालं आहे.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघात पुनरागमन करणं हा प्रवास अश्विनसाठी नक्कीच सोपा नव्हता. गेल्या चार वर्षांमध्ये आर.अश्विननं संघात आपलं स्थान प्राप्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि यात अनेकदा त्याला टीकेला देखील सामोरं जावं लागलं. या कठीण काळाबाबत बोलताना अश्विननं नुकतंच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
"एक खेळाडू म्हणून तुम्हाला अनेकदा लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. यातून तुम्हाला पुनरागमन करावं लगातं. माझं करिअर संपलं असंही अनेकांना वाटलं होतं. मी जेव्हा चेन्नईत सामना खेळत होतो तेव्हा त्या सामन्यांसाठीही मी खूप मेहनत घेत होतो. त्यावेळी मी अनेकांना कुजबुजताना पाहिलं होतं. याचं आंतरराष्ट्रीय करिअर आता संपुष्टात आलं आहे म्हणूनच हा आता क्लब क्रिकेट खेळतोय असं अनेकांना वाटत होतं. मी वारंवार हे ऐकत आलो आहे. बहुतांशवेळी मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण काही वेळा वाईटही वाटायचं", असं आर.अश्विन म्हणाला. तो एका स्पोर्ट्स कार्यक्रमात बोलत होता.