दुबई : आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला मागे टाकून अव्वल स्थानी विराजमान झाला. त्याने ८८७ रेटिंग पॉइंटसह तब्बल पाच स्थानांनी झेप घेतली. गोलंदाजांमध्ये भारताच्या रविचंद्रन अश्विनने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर असून त्याचे ८८३ गुण आहेत. मार्नस लाबुशेन ८७७ गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरला. ट्रॅव्हिस हेड चौथ्या स्थानी असून त्याचे ८७३ गुण आहेत. बाबर आझम पाचव्या, स्टीव्ह स्मिथ सहाव्या, तर उस्मान ख्वाजा सातव्या क्रमांकावर आहे. डॅरिल मिशेल आठव्या, दिमुथ करुणारत्ने नवव्या व ऋषभ पंत दहाव्या स्थानी कायम आहे.
अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर
गोलंदाजाच्या कसोटी क्रमवारीत ऑफ स्पिनर रविचंद्रन आश्विन ८६० गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडचा जेम्स अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर असून दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा तिसऱ्या स्थानी आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स चौथ्या आणि इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन पाचव्या स्थानी आहे.
भारतीयांचा जलवा
अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा आणि अश्विन या भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखला आहे. जडेजा ४३४, तर अश्विन ३५२ गुणांसह अनुक्रमे पहिल्या दोन स्थानी विराजमान आहेत. यानंतर बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या स्थानी असून चौथ्या स्थानावर भारताचा अक्षर पटेल आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स पाचव्या क्रमांकावर आहे.
Web Title: Ravichandran Ashwin retains top spot, Joe Root becomes 'Number One'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.