नवी दिल्ली : ‘२०१८ मध्ये निवृत्ती घेण्याचा विचार करीत होतो. या काळात खराब फॉर्मशी झुंज देत असताना मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. सहा चेंडू टाकल्यावरच थकवा जाणवायचा आणि आता विश्रांतीची गरज आहे असे वाटायचे.’ टीम इंडियाचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने हा खुलासा केला आहे. सर्व विपरीत गोष्टींवर यशस्वी मात करीत त्याने शानदार पुनरागमन केले. टी-२० विश्वचषकात भारतीय संघातही स्थान मिळविले. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो.
मुख्य फिरकी गोलंदाज असण्यासोबतच अश्विनने अनेक वेळा बॅटनेही दमदार कामगिरी केली आहे आणि भारतासाठी सामने जिंकले आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना अश्विन म्हणाला, ‘२०१८ ते २०२० या कालावधीत अनेक वेळा त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला. मी सतत चांगले करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु गोष्टी कठीण होत होत्या. सहा चेंडू टाकल्यावर मला दम लागत होता, संपूर्ण शरीर थकले होते. गुडघेदुखी वाढली की मी लहान उडी मारून गोलंदाजी करायचो. खेळाडू माझ्या दुखापतीबद्दल संवेदनशील नव्हते आणि कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. भारतीय संघातील अनेक खेळाडूंवर विश्वास व्यक्त करण्यात आला, मी संघासाठी अनेक सामने जिंकले असताना माझ्यावर विश्वास ठेवण्यात आला नव्हता,’ असे अश्विन म्हणाला.
वडिलांचे म्हणणे खरे ठरले
अश्विनने सांगितले, ‘२०१८ मध्ये जेव्हा मी पुन्हा दुखापतग्रस्त झालो, तेव्हा निवृत्ती घेण्याचा विचार केला. मी केवळ पत्नीशीच बोलत असे. माझ्या वडिलांना विश्वास होता की, एक दिवस त्यांचा मुलगा एकदिवसीय आणि टी-२० संघात परत येईल आणि मृत्यूपूर्वी ते पाहू शकतील. माझ्यासाठी ही अतिशय वैयक्तिक बाब होती.’
शास्त्री यांच्या वक्तव्याचे वाईट वाटले...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१९ ला सिडनी कसोटीत पाच बळी घेतल्यानंतरही मुख्य कोच रवी शास्त्री यांनी कुलदीप यादव हा विदेशात भारताचा सर्वोत्कृष्ट फिरकीपटू असल्याचे वक्तव्य केले होते. याविषयी ३५ वर्षांचा अश्विन म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियात एका फिरकीपटूला पाच गडी बाद करणे किती कठीण असते याची जाणीव असताना शास्त्री यांनी असे वक्तव्य कसे काय केले याचे आश्चर्य वाटले. त्यांच्या वक्तव्यामुळे हताश झालो होतो. ऐतिहासिक मालिका विजयानंतर आयोजित पार्टीतही मी सहभागी झालो होतो, मात्र हॉटेलच्या खोलीत परतल्यानंतर पत्नीशी बोलून मन मोकळे केले होते.’