Join us  

आर अश्विन विक्रमी ५०० व्या विकेटसाठी झपाटलेला होता; इंग्लंडच्या दिग्गजाचा गंभीर आरोप

विशाखापट्टणम येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन ( R Ashwin )  हा विक्रमी ५००व्या विकेट घेण्यासाठी झपाटलेला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 11:13 AM

Open in App

India vs England 2nd Test : विशाखापट्टणम येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन ( R Ashwin )  हा विक्रमी ५००व्या विकेट घेण्यासाठी झपाटलेला होता, असा दावा इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हीन पीटरसन ( Kevin Pietersen ) याने केला आहे. भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लडवर १०६ धावांनी विजय मिळवला, परंतु ३७ वर्षीय अश्विनला या सामन्यात पहिल्या डावात १२ षटकांत ६१ धावा देऊन एकही विकेट मिळवता आली नव्हती. दुसऱ्या डावात त्याने १८ षटकांत ७२ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या, परंतु यातल्या शेवटच्या १२ षटकांत त्याला विकेट घेता आली नाही आणि त्यामुळे त्याला ४९९ विकेट्सवर समाधानी रहावे लागले.

दुसऱ्या कसोटीनंतर पीटरसनने दावा केला की, ५००व्या विकेटच्या विक्रमाचा पाठलाग करताना अश्विन दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करू शकला नाही. "अश्विन फक्त माईलस्टोनचा पाठलाग करत होता. म्हणूनच तो नीट गोलंदाजी करू शकला नाही. तो योग्य दिशेने गोलंदाजी करू शकला असता. मला वाटले की तो ऑफ-स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करत होता. तो राईट हँडेड फलंदाजाच्या विकेटवर खूप जास्त गोलंदाजी केली. तो सातत्याने गोलंदाजीत अधिक बदल करत होता," असे पीटरसन म्हणाला.

सर्वोत्तम गोलंदाजी न करूनही अश्विनने त्याच्या पहिल्या चार षटकांत ३ विकेट्स मिळवल्या आणि यामध्ये बेन डकेट, ऑली पोप व जो रूट या महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश होता. टॉम हार्टलीची विकेट मिळाली असती तर त्याचे कसोटीत पाचशे विकेट्स पूर्ण झाल्या असत्या. त्याच्या गोलंदाजीवर हार्टलीच्या झेलचे जोरदार अपील झाले, परंतु DRS मध्ये हा निर्णय बदलला गेला आणि इंग्लंडच्या फलंदाजाला नाबाद दिल्याने अश्विन चिडला. पीटरसन म्हणाला, तो एका विकेटसाठी जोरदार प्रयत्न करत होता.

"तो एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि त्याला काही मोठे यश मिळाले आहे.  त्याला आणखी एक विकेट हवी आहे आणि जेव्हा तो ती मिळवेल तेव्हा तुम्ही त्याला अधिक रिलॅक्स पाहाल. त्याचा भार कमी होईल आणि मी आता सर्वोत्तम खेळू शकतो, असे त्याला वाटेल," असेही पीटरसन म्हणाला. आर अश्विनने घरच्या मैदानावर ५७ कसोटीत २१.२७च्या सरासरीने ३४६ विकेट्स घेतल्या आहेत आणि यात २७ वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तो एकूण ४९९ विकेट्सह कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये नवव्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :आर अश्विनभारत विरुद्ध इंग्लंड