अयाज मेमन
पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करीत भारताने विश्वचषकाच्या रंगीत तालमीची यशस्वी सुरुवात केली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतला हा पहिलाच सामना असला तरी भारताची एकूण कामगिरी प्रभावी ठरली. दोन्ही संघांतील काही अनुभवी खेळाडू या सामन्यात खेळले नाहीत; मात्र तरीसुद्धा दोन्ही संघांकडून प्रगल्भ खेळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे भारताच्या विश्वचषक अभियानाची सुरुवातही चेन्नईला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. त्यामुळे या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पहिल्या वनडे सामन्यावर सर्वार्थाने छाप सोडली ती वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने. सूर्यकुमार यादवचे फॉर्ममध्ये येणेही चाहत्यांसाठी सुखावणारे ठरले. एकूणच भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये असलेला जोश बघण्यासारखा होता.
मोहम्मद शमीचा जलवा मोहालीची खेळपट्टी गोलंदाजांना फारशी मदत करणारी नव्हती. तरीसुद्धा मोहम्मद शमीने ५१ धावा देत घेतलेले ५ बळी त्याची भेदकता सिद्ध करतात. जसप्रीत बुमराह संघात परतल्यापासून भारताच्या वेगवान गोलंदाजी विभागामध्ये एक सृदृढ स्पर्धा बघायला मिळते आहे. कारण भारताचे तीनही वेगवान गोलंदाज सध्या तुफान फॉर्मात आहेत. त्यामुळे एकालाही संघातील आपले स्थान गमवायचे नाही. सिराजने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात स्वत:ला सिद्ध केले. बुमराहचे वेगळे गुणगान गाण्याची गरज नाही. या दोघांमुळे काहीसा माघारलेल्या शमीनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला डंका वाजवला. त्यामुळे आता हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर या गोलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळू शकते. कारण शार्दूलच्या जागी शमीला खेळवा, अशी मागणीही आता जोर धरायला लागली आहे.
अश्विनचे महत्त्व अधोरेखितपहिल्या वनडे सामन्यात एक बळी घेणाऱ्या रविचंद्रन अश्विनला उर्वरित दोन सामन्यांसाठी संघात कायम ठेवायला हवे. कारण मोहालीच्या पाटा खेळपट्टीवर त्याने केलेली गोलंदाजी त्याच्या प्रदीर्घ अनुभवाची साक्ष देेते. अश्विनचा हाच अनुभव आगामी विश्वचषकात भारतासाठी ‘ट्रम्प कार्ड’ सिद्ध होऊ शकतो. त्यामुळे जर अक्षर तंदुरुस्त झाला नाही तर अश्विनचा संघात जरूर समावेश करायला हवा. तो संघात आल्याने इतर फिरकीपटूंमध्ये स्पर्धा वाढेल. ज्याचा अप्रत्यक्षपणे फायदा भारतीय संघालाच होईल.
(लेखक लोकमतचे कन्सल्टिंग एडिटर )