जामनगर : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी गुजरात विधानसभेच्या रिंगणात आहेत. रिवाबा जडेजा या गुजरातमधील जामनगर येथून भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे पत्नीच्या प्रचारासाठी जडेजा मैदानात उतरला आहे. खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी जामनगरमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा जडेजाने आपल्या पत्नीला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. रवींद्र जडेजाने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "जामनगरवासियांनो भाजपला प्रचंड बहुमतांनी विजयी करा".
जडेजाने पत्नीसाठी मागितली साथ
अलीकडेच जडेजाने पत्नीच्या प्रचारासाठी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात रवींद्र जडेजा भगव्या रंगाच्या कुर्त्यात दिसला होता. रवींद्र जडेजाच्या कुर्त्याचा रंग पाहून, तोही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाने जामनगर (उत्तर) मतदारसंघातून रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. या कार्यक्रमात रवींद्र जडेजाने जामनगरमधील जनतेला रिवाबा यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
रिवाबा यांच्यासाठी मोठ्या नेत्याचे तिकीट कापले
भाजपने जामनगर उत्तरमधून भारतीय क्रिकेटपटू आणि जामनगरचा रहिवासी असलेल्या रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. रिवाबा यांना राजकारणाचा किंवा निवडणूक लढविण्याचा कोणताही पूर्व अनुभव नाही. विशेष म्हणजे, रिवाबा यांच्यासाठी भाजपने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह यांचे तिकीट कापले आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान
गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. मागील २७ वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, भाजप सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर काँग्रेस आणि आपही भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Ravindra Jadeja appealed to the people of Jamnagar to elect BJP with a majority for the victory of his wife Rivaba Jadeja
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.